•   जय कोल्हटकर, कस्तुरी सावेकर एव्हरेस्टवीर 
  •   जितेंद्र गवारेची माऊंट ल्होत्सेवर चढाई यशस्वी

पुणे : महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी या आठवडय़ात तीन गिर्यारोहण मोहिमा यशस्वी करत माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट ल्होत्से ही शिखरे पादाक्रांत केली. मुंबईकर जय कोल्हटकर आणि कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर यांनी माऊंट एव्हरेस्टवर तर पुणेकर जितेंद्र गवारे याने माऊंट ल्होत्सेवर चढाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनिअिरगचा विद्यार्थी जय कोल्हटकर याने गुरुवारी माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. जयपाठोपाठ शनिवारी कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने एव्हरेस्टवर आणि जितेंद्र गवारेने ८५१६ मीटर उंचीचे माऊंट ल्होत्से या जगातील चौथ्या उंच शिखरावर चढाई केली. 

गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनियिरगचा विद्यार्थी असलेल्या मुंबईच्या जय कोल्हटकरने ८८४८ मीटर उंच असलेल्या जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर गुरुवारी यशस्वी चढाई केली. जय हा गार्डियन गिरिप्रेमीच्या पहिल्या प्रस्तरारोहण अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. या अभ्यासक्रमात त्याने सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा सन्मान मिळवला. त्यानंतर त्याने रशियातील माउंट एलब्रुस आणि नेपाळमधील माउंट मेरा शिखरावर गार्डियन गिरिप्रेमीच्या माध्यमातून चढाई केली. कस्तुरीने सरावाचा भाग म्हणून खडतर शिखर माऊंट अन्नपूर्णा -१ सर केले. ९ मे रोजी तिने एव्हरेस्ट चढाईला सुरुवात केली. १३ तारखेला दुपारी कॅम्प ४ ला पोहोचली. शनिवारी पहाटे तिने माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले.

जितेंद्र गवारेची ही पाचवी अष्टहजारी शिखर मोहीम ठरली आहे. पाच अष्टहजारी शिखरांवर चढाई करणारा गिरिप्रेमीच्या आशिष मानेपाठोपाठ तो दुसरा महाराष्ट्रीय गिर्यारोहक ठरला आहे. या आधी २०१९ मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेले माउंट कांचनजुंगा, २०२१ च्या एप्रिलमध्ये जगातील दहावे उंच शिखर असलेले माउंट अन्नपूर्णा- १, मे महिन्यात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट तर सप्टेंबरमध्ये जगातील आठवे उंच शिखर असलेल्या माउंट मनास्लू शिखरावर जितेंद्रने यशस्वी चढाई केली.

कोल्हापूर येथील कस्तुरी सावेकर हिने अन्नपूर्णा पाठोपाठ एव्हरेस्टवर चढाई केली. मुंबईकर जय कोल्हटकरने एव्हरेस्ट तर जितेंद्र गवारेने माऊंट ल्होत्से शिखर सर केल्याने महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या कामगिरीने संपूर्ण गिर्यारोहण जगताचे लक्ष वेधले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– उमेश झिरपे. ज्येष्ठ गिर्यारोहक, अध्यक्ष, महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ