उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे. मनोज जरांगे हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्या व्यक्तीच्या बाजूने रहा, असे देखील आवाहन जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायच आहे, त्याला नक्कीच पाडेल. पुढे ते म्हणाले, मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केलेत. परंतु, मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमिश दाखवून माणसं फोडली जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा – “जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”

हेही वाचा – औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न

सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. आमची मनं एक आहेत. दोन मन होऊ शकत नाही. कोणाला निवडून आणायचं हे समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आई बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांनी मराठा समाजाला काही दिलेलं नाही. जो सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने रहा, असेही जरांगे म्हणाले.