पुणे : मराठा उद्योजक संघटनेच्या (एमईए) वतीने २७ ,२८ फेब्रुवारी आणि १ मार्च, २०२६ रोजी पुण्यातील कृषी मैदानावर एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले असल्याची औपचारिक घोषणा मराठा उद्योजक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी शुक्रवारी केली.
या बिझनेस एक्स्पोअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाची औपचारिक घोषणा यावेळी उद्योजक आणि क्रेडाई राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली. एमईएचे माजी अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुऱ्हाडे, सई बहिरट पाटील. नितीन भोसले, सागर तुपे, महेश भागवत, विजय गवारे, तेजस चारवाड, आश्रम काळे, अनिकेत हेलुडे, सायली काळे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
या एक्स्पोबाबत विक्रम गायकवाड म्हणाले की, मराठा समाजात उद्योजकता वाढीस लागावी, या समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्राविषयी योग्य व सखोल ज्ञान मिळावे या हेतूने मागील १४ वर्षांपासून मराठा उद्योजक संघटना कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समुदायाला एक उद्योजक समुदाय म्हणून पुढे नेत असताना या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात परदेशातील मराठा उद्योजक, व्यावसायिक आणि व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.
या निमित्ताने देश- विदेशातील हजारो गुंतवणूकदारांना, उद्योजकांना व धोरणकर्त्यांना भेटण्याची संधी सहभागी उद्योजकांना मिळेल. याचबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करीत व्यवसाय वाढविण्याची, उद्योजकांना आपला ब्रँड जागतिक पातळीवर सादर करण्याची, नवीन बाजारपेठा व गुंतवणूक संधींमध्ये प्रवेश करण्याची, तज्ज्ञ आणि आघाडीच्या नेतृत्त्वकडून ज्ञान व उद्योगविषयक बारकावे समजून घेण्याची संधी उपलब्ध होईल, असेही गायकवाड यांनी संगितले.
पाचशेहून अधिक स्टॉल्स
या एक्स्पोमध्ये बांधकाम व्यवसाय, उत्पादन, आयटी, एफएमसीजी, कृषी-तंत्रज्ञान, जीवनशैली, शिक्षण, आदरातिथ्य, सेवा, आयात-निर्यात, ऑटोमोबाईल, आरोग्य व कल्याण, बँकिंग आणि वित्त यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश असणार असून या क्षेत्राशी संबंधित पाचशेहहून अधिक स्टॉल्स देखील याठिकाणी असतील. आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्था, सरकारी प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि उद्योग विषयक तज्ज्ञ यांची उपस्थिती देखील या एक्स्पोचे वैशिष्ट्य असेल, असे विक्रम गायकवाड यांनी नमूद केले.
