‘मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक शांताराम बापू कुंजीर यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं मंगळवारी पहाटे निधन झालं. पुण्यात त्यांचं निधन झालं आहे. शांताराम बापू कुंजीर मराठा महासंघ, मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चा यांच्यासहित विविध पुरोगामी चळवळीचे प्रणेते होते. मराठा आरक्षणासह शेकडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे अनेकदा त्यांना जेलमध्येही जावं लागलं होतं.
शांताराम बापू कुंजीर यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं सांगितलं आहे. संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मराठा समाजासाठी पुर्णवेळ काम करणारे शांताराम कुंजीर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, मराठा क्रांतीमोर्चा सामाजिक संस्थांशी ते निगडीत होते. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो हिच प्रार्थना”.
मराठा समाजासाठी पुर्णवेळ काम करणारे शांताराम कुंजीर यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, मराठा क्रांतीमोर्चा सामाजिक संस्थांशी ते निगडीत होते.
त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो हिच प्रार्थना. pic.twitter.com/oMOqbC2LQJ— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 5, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असं म्हणत शोकभावना व्यक्त केली आहे. “मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाजासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी लढणारे शांताराम कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शांताराम कुंजीर यांनी मराठा समाजाच्या दु:ख, वेदना आणि प्रश्नांसाठी कायमच संघर्षाची भूमिका घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करताना तरुणांनी वाचन करुन आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. परस्पर विरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवाद ठेवून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम तडीस नेले. गेल्या 26 वर्षांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे काम केले. त्यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कार्यकर्ता हरपला आहे”.