गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयास आज (शुक्रवार) भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाच्या मुद्यावर रस्त्यावर उतरण्याबाबत केलेल्या विधानवर प्रतिक्रिया दिली. सध्या करोना आजाराची परिस्थिती लक्षात घेता, अशी चिथावणीखोर भाषा कोणीच वापरू नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच, सामंजस्याची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी म्हटले.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना, ”सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवायचे असल्यास केंद्रीय मागसवर्गीय आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे. मात्र, त्याची घटना दुरूस्ती दिल्लीतच करावी लागेल. वेळ प्रसंगी घटना दुरूस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल.” असं यावेळी वळेस पाटील यांनी मत व्यक्त केलं.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामधील सेवा कक्षातून एका नागरिकाला फोनही लावला.

मराठा आंदोलनात भाजप सक्रिय सहभागी होणार – चंद्रकांत पाटील

तसेच, शहरात १५ दिवसांपूर्वी एका गुंडाच्या हत्येनंतर अंत्यविधी वेळी रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर कारवाई झाली पण अशा घटना रोखण्यासाठी आपल्याकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत?. यावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी, शहरात एका अंत्यविधीच्या दरम्यान रॅली काढण्याची घटना घडली होती. त्या विरोधात पोलिसांकडून संबधितांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. मात्र आता यापुढे अशा घटना लक्षात घेता, पोलीस आणखी कडक कारवाई करतील. अशी ग्वाही दिली.

पुणे पोलिसांकडून अंतर्गत बदल्या संदर्भात एक अॅप तयार करण्यात आले आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, पोलिसांच्या बदलीमध्ये पारदर्शकता आणि वशिलाबाजी होऊ नये याकरिता चांगला निर्णय घेतला गेला आहे. अंतर्गत बदली करण्यासाठी हे चांगलं पाऊल असल्याचंही त्यांनी सांगितले.