दर दहा कोसावर भाषा बदलते असे म्हटले जाते. या पद्धतीने नानाविध बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. पुण्यातील शनिवार-नारायण आणि सदाशिव या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे मानले जात होते. त्यामुळे नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे जितके खरे आहे तितकेच नारायण पेठी या नावाची एक बोली आहे. भारतभर विखुरल्या गेलेल्या स्वकुळ साळी म्हणजेच विणकर समाजाच्या ‘नारायण पेठी’ या बोली भाषेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.
साडी, सतरंजी, चादर, पितांबर यांची हातमागावर कापड विणून निर्मिती करणारा अशी स्वकुळ साळी समाजाची ओळख आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, पैठण, येवला, नाशिक, अहमदाबाद, नवसारी, सुरत, आदोनी, बंगळुरू, हुबळी, बेळगाव, उज्जन, इंदूर अशा बाजारपेठेच्या ठिकाणी या समाजाची वस्ती आहे. साहजिकच हे लोक वास्तव्यास असलेल्या राज्याची राजभाषा उत्तम प्रकारे बोलतात. आंध्र प्रदेशातील नारायण पेठ (जि. मेहबूबनगर) या गावी मोठय़ा प्रमाणावर वास्तव्यास असलेले विणकर समाजाचे लोक नारायण पेठी ही मराठी प्रमाण बोली आजही बोलतात. देशाच्या अन्य राज्यांत उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले लोक त्या राज्यांमध्ये आपापल्या उंबऱ्याच्या आत हीच नारायण पेठी बोली बोलतात. तर, या गावातून नोकरी-व्यवसायासाठी अन्य ठिकाणी गेलेले लोकही घरामध्ये याच बोलीचा वापर करतात. सध्या ही बोली बोलता येणारे काही मोजक्या ज्येष्ठ व्यक्ती उरल्या आहेत. त्यामुळेच त्या ज्येष्ठांच्या अस्तानंतर ही बोली लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या नारायण पेठी बोलीचे भाषक सर्वेक्षण करून त्याची दस्तऐवजीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लक्ष्मण लोणकर यांनी दिली.
वास्तविक नारायण पेठी बोली भाषा मराठीशी संबंधितच आहे. ही बोलण्यास सहज सुलभ, ऐकण्यास गोड आणि मवाळ असून स्वत:च्या समाजाची स्वतंत्र अशी वैशिष्टय़पूर्ण बोली आहे. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘तेलंगणातील मराठा समाज-भाषा आणि संस्कृती’ या संशोधन प्रबंधामध्ये स्वत:ची बोली असलेल्या अनेक जमाती तेलंगणामध्ये आढळून आल्या असून त्यामध्ये स्वकुळ साळी या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. हातमागावर विणकाम करणे हाच व्यवसाय असल्याने हा समाज शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. त्यामुळे या बोलीची लिपी देवनागरी असली, तरी या बोलीतील लिखित साहित्य आणि दस्तऐवज उपलब्ध होणे दुर्मिळ आहे. तरीही काही समाजबांधवांकडून या बोलीचे सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू झाला असल्याचेही लोणकर यांनी सांगितले.
….
मराठी आणि नारायण पेठी बोलीतील शब्द पुढीलप्रमाणे : माझे – माझू, तुझे – तुझू, काय झाले? – का झालू?, दुखते – दुखालै, बरे – बरू, बघ – देक, बोलावणे – बोलिला, मडके – मडकू, कोठून – कटून, देऊळ – गुडी, लहान – धकटू, सतरंजी – झमकाना, भाकरी – भक्कर
काही वाक्प्रचार : मुलगी पसंत पडली वाङ्निश्चय झाला – पैर पसंत पडली घट्ट झालू,. आता मला काम करण्यास जायचे आहे – आंता मज काम करास जाँवई
काही वाक्ये : मी काम करतो – मी काम करतैय, ही आता आली – हिने आंता आली, तो घरी आला – तेने घरांन आला, मी घरी गेलो – मी घरांन गेलू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language narayan pethi survey
First published on: 27-02-2015 at 03:25 IST