शब्द, त्याचे विविध अर्थ, त्या शब्दाला असलेले समानार्थी शब्द, शब्दाचे व्यावहारिक अर्थ याविषयीची समग्र माहिती वाचकांसाठी शुक्रवारी खुली झाली. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत आणि मुलाखतकाराच्या मुलाखतीतून श्रोत्यांना शब्दाचे वैभव उमगले.
नितीन प्रकाशन आणि अक्षरधारा यांच्यातर्फे श्रीकांत धुंडिराज जोशी यांनी संपादित केलेल्या ‘मराठी शब्दवैभव’ या शब्दकोशाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते झाले. उत्तरार्धात विनया देसाई यांनी सुधीर गाडगीळ यांच्याशी ‘शब्दांचे महत्त्व आणि वाचन’ या विषयावर संवाद साधला. प्रकाशक नितीन गोगटे या वेळी उपस्थित होते.
भाषेचा आनंद देण्याचे काम ‘मराठी शब्दवैभव’ हा कोश निश्चितपणे करतो. मराठीला जागतं ठेवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून या कोशाचे स्वागत केले पाहिजे, असे मत डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. कथा-कादंबरी वाचनाचा आनंद या कोशाच्या वाचनातून मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
शब्दांनी माणसं जोडली जातात हे समजल्यावर शब्दांविषयीचे प्रेम वाढत गेले आणि या शब्दांवरच्या प्रेमातूनच माणसेही आपोआप जोडली गेली, अशी भावना सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली. प्रत्येकाला व्यक्त व्हायचचं असतं. त्याला आवडीच्या विषयावर बोलतं करण्याचा प्रयत्न मी आनंदाने करीत आहे. सत्ता, संपत्ती, पद हे सारे विसरून सारे वलयांकित माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. हे लोक मोठे असले तरी माणूसच असतात. म्हणूनच मुलाखत घेताना माझ्यावर कधीच कोणतेही दडपण नसते, असेही त्यांनी सांगितले.
जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन गोगटे यांनी प्रास्ताविक केले.