सत्तारूढ भाजपकडून निर्णयाच्या समर्थनार्थ उपक्रम
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने निश्चलनीकरणाच्या निषेधार्थ सत्तारूढ भारतीय जनता पक्ष सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांबरोबर स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी विविध मार्गानी निषेध केला. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली ८ नोव्हेंबरला नोटाबंदी करून हुकूमशाहीचे दर्शन दिले. मात्र, निश्चलनीकरणानंतर काळा पैसा बाहेर आला नाही किंवा परदेशातील काळा पैसाही बाहेर आला नाही, असा आरोप निश्चलनीकरणाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष, संघटनांकडून करण्यात आला, तर दुसरीकडे सत्तारूढ भाजपाकडून काळ्या पैशाला चाप बसल्याचे सांगत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निश्चलनीकरण निर्णयाचा निषेध करण्यात आला. अच्छे दिन का हो गया प्रचार, कौन सहेगा अत्याचार, सबका साथ सबका विकास, उद्योगधंदे साफ रोजगार भकास अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, बोहरी आळी, सोन्यामारुती चौक, दारुवाला पूल, नरपतगिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता करण्यात आली. शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण, जालिंदर कामठे, संजोग वाघिरे, जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रुपाली चाकणकर या वेळी उपस्थित होत्या.
निश्चलनीकरणाच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर परशुराम भाऊ महाविद्यालय ते कै. वसंतदादा पाटील पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात निश्चलनीकरणावर आधारित पथनाटय़ाने करण्यात आली. शहरअध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, रोहित टिळक, संजय बालगुडे, संगीता तिवारी आदी या वेळी उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि शहराच्या विविध भागात ‘लुटारू दिवस’ साजरा करण्यात आला. पक्षाच्या युवक आघाडीचे विकास साळवे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर इंदिरानगर, स्वारगेट चौक, दांडेकर चौक, लोकमान्य टिळक चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, महापालिका परिसर व बंडगार्डन येथे निदर्शने करण्यात आली. शहर सरचिटणीस गणेश भोसले, महिला अध्यक्ष पंचशीला कुडवे, प्रा. म. ना. कांबळे या वेळी उपस्थित होते. दलित पँथरच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, शहराध्यक्ष प्रकाश साळवे या वेळी उपस्थित होते. हमारी अपनी पार्टीच्या वतीने निश्चलनीकरणानंतर बँकांसमोरील रांगांमध्ये बळी पडलेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन गुप्ता, बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले.
रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष नितीन बालकी, सरचिटणीस विनायक बंडी या वेळी उपस्थित होते. भीम आर्मीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेतृत्वाखाली निश्चलनीकरणाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालण्यात आले. सीताराम गंगावणे, प्रदीप कांबळे या वेळी उपस्थित होते. रिपब्लिकन मातंग सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली. कुसुम साळवे, विजय वडागळे या वेळी उपस्थित होते.
विविध उपक्रम
निश्चलनीकरणाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्ष कसबा मतदारसंघाच्या वतीने लोकमान्य टिळक रस्त्यावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक राजेश येनपुरे, सरचिटणीस प्रमोद कोंढरे, नगरसेविका गायत्री खडके, धीरज घाटे यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘निश्चलनीकरणामुळे देशात अर्थक्रांती होऊन देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. टू जी घोटाळा, चारा घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे धाबे दणाणल्यामुळेच त्यांची आंदोलने सुरू आहेत’, असे महापौर टिळक यांनी सांगितले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने निश्चलनीकरणाचे जोरदार समर्थन करत ‘व्हाईट डे’ पाळण्यात आला. पुणे रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या नतृत्वाखाली निश्चलनीकरण निर्णयाचे स्वागत करण्यात आले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे या वेळी उपस्थित होत्या.