अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली करदात्या नागरिकांच्या पैशावर होणाऱ्या सहलींवर कितीही टीका होत असली, तरी या दौऱ्यांचा सोस कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शकुंतला धराडे यांची महापौरपदाची मुदत संपण्यापूर्वी त्या स्पेनला जाणार आहेत. तर, दक्षिण भारतात जाऊन ‘अभ्यास’ करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण सदस्यही सरसावले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी हे दोन्ही विषय ऐनवेळी मांडण्यात आले आणि कोणतीही चर्चा न करता मंजूरही झाले.
स्पेन येथे १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१५’ या परिषदेस महापौर उपस्थित राहणार आहेत. संयोजकांकडून तसे निमंत्रण िपपरी पालिकेला प्राप्त झाले आहे. महापौरांसमवेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता साळुंके सहभागी होणार आहेत. यासाठी होणाऱ्या संभाव्य खर्चास समितीने मान्यता दिली. महापौरांची वर्षपूर्ती नुकतीच झाली असून, सव्वा वर्षांची मुदत संपण्यापूर्वी ‘जाता जाता’ परदेश दौऱ्याची संधी त्यांना परिषदेच्या निमित्ताने मिळाली आहे. याशिवाय, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या दक्षिण भारताच्या अभ्यास दौऱ्यास तसेच त्यासाठी होणाऱ्या साडेसहा लाखाच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. समितीचे सदस्य २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ असे पाच दिवस या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. ठराव कायम होण्याची वाट न पाहता सदर रक्कम उद्यान अधीक्षकांच्या ताब्यात देण्याचे आदेशही स्थायी समितीने दिले आहेत.