सामिष खवय्यांकडून मटण, मासळीला मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : हजारो किलो मटण, मासळी तसेच चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांकडून सरत्या वर्षांला निरोप देण्यात आला. नववर्षांच्या निमित्ताने मटण, मासळी आणि चिकनच्या मागणीत मंगळवारी वाढ झाली. मटणाचे प्रतिकिलोचे दर ५८० ते ६०० रुपयांपर्यंत पोहचल्याने सामिष खवय्यांचा हिरमोड झाला, तरी मटणाला मागणी चांगली होती.

सरत्या वर्षांला निरोप देऊन नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी मंगळवारी सामिष खाद्यपदार्थ तयार करण्याचा बेत आखला होता. अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन सहकुटुंब तसेच मित्र मंडळीबरोबर सामिष खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याचा बेत आखला होता. घरगुती ग्राहकांनी सकाळीच मटण, मासळी तसेच चिकनची खरेदी केली. त्यामुळे शहरातील मटण, मासळी बाजारात मंगळवारी सकाळपासून गर्दी झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी, खाडीतील मासळी, नदीतील मासळी तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची आवक झाली. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मासळीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली.

शहरातील कसबा पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, फग्र्युसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्के ट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट तसेच लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. याबाबत पुणे शहर मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बाजारात मटणाच्या दरात टप्याटप्याने वाढ होत आहे. मंगळवारी मटणाचा प्रतिकिलोचा दर ५८० ते ६०० रुपये असा होता. बाजारात बकऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. परराज्यातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील बाजारपेठेतून बक ऱ्यांची खरेदी केल्याने बाजारात मटणाच्या दरात वाढ झाली आहे.

घरगुती ग्राहक तसेच हॉटेल विक्रेत्यांकडून मटणाला चांगली मागणी राहिली. पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात महापालिकेच्या मालकीची १४ मटण मार्केट आहेत. खडकी तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची दोन मटण मार्केट आहेत. खरेदीसाठी दुपारनंतर गर्दी झाली होती,असे कांबळे यांनी सांगितले.

शीतल अ‍ॅग्रोचे रुपेश परदेशी म्हणाले, पुणे जिल्ह्य़ातील नगर, सोलापूर रस्ता तसेच भोर, पुरंदर तालुक्यात खासगी कोंबडी पालन व्यावसायिकांचे फार्म आहेत. नववर्षांसाठी चिकनच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे जिवंत कोबंडय़ाची मोठी आवक मंगळवारी झाली. हॉटेल व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती. पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हजार किलो चिकनची विक्री झाली. प्रतिकिलो चिकनचा दर १५० रुपये राहिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meat and fish consumption more on the new year in pune zws
First published on: 01-01-2020 at 02:48 IST