पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर आजारांवरील उपचारांचे पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव मोठे सरकारी रुग्णालय आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयावर आलेला ताण ‘लोकसत्ता’ने मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी ससून रुग्णालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा >>> अहमदाबाद सर्वात परवडणारे शहर; पुणे, कोलकता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी

ससून रुग्णालयात दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागांमध्ये उपचारासाठी येत असतात. एवढ्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे अपुरे मनुष्यबळ व आर्थिक व्यवस्थापनावरही ताण येत असल्याचे अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पदे लवकरात लवकर भरली जातील आणि अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील ‘एम्स’च्या धर्तीवर या रुग्णालयामध्येही दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळतील, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले. या आढावा बैठकीत आरोग्य संचालक डॉ. अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती किणीकर, अधीक्षक डॉ. सुनील भामरे यांच्यासह रुग्णालय व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. बैठकीआधी मंत्री मुश्रीफ यांनी हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागासह सर्वच विभागांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली. बालरुग्ण विभागाच्या नवजात बालकांसाठीच्या मानवी दूध पेढीचेही त्यांनी कौतुक केले.

हेही वाचा >>> स्वातंत्र्य दिनी लोणावळय़ात उच्चांकी गर्दी; पावसाच्या विश्रांतीमुळे पर्यटकांचा हिरमोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कौतुक! ससूनमधील रुग्णांना द्यावयाच्या मोफत जेवणाचा अन्नपूर्णा विभाग दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्यावतीने मोफत चालविला जातो. या विभागातही मंत्री मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती घेतली. मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी या वेळी नमूद केले.