केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले वन आणि पर्यावरण विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे केंद्रीय वन-पर्यावरण आणि माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सांगितले.
केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेल्या जावडेकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये ही माहिती दिली. संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी आणि सरचिटणीस राजा पाटील उपस्थित होते.
देशाने सुशानासाठी ऐतिहासिक कौल दिला आहे. सगळ्या मंत्र्यांनी विषय नीट समजून घेत वेगाने कामाला लागावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, वन आणि पर्यावरण विभाग हा प्रगती थांबविणारा असाच गैरसमज आहे. पण, वस्तुस्थिती तशी नाही. संरक्षण विभागाचे प्रश्न मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने क्षेपणास्त्र विकसनाचा कोर्यक्रम होऊ शकत नाही. बंदरे आणि विमानतळाचेही काही प्रश्न मंत्रालयाशी संबंधित आहेत. विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल. गरिबी दूर करण्यासाठी विकास महत्त्वाचा आहे. शोषण नव्हे तर पर्यावरणाचे पोषण करूनच विकास होऊ शकतो हे सिद्ध करण्यात येईल. वन आणि पर्यावरण मंत्रालयाशी प्रलंबित असलेले प्रश्न, बीआरटी प्रकल्पातील परवानगीची अडचण यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती क्षमतेचा वापर करण्यात येणार आहे.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आधी आपल्या नेत्यांच्या शिक्षणाचे पहावे, असा टोला जावडेकर यांनी लगावला. वसंतदादा हे राज्यातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री होते. शिक्षणावरून त्यांचे मोजमाप करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक लढविणार आहेत याकडे लक्ष वेधले असता लोकशाहीने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला असल्याने कोणीही निवडणूक लढवू शकतो, असे जावडेकर म्हणाले.
शहरातील आठही आमदार महायुतीचे
जनेतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून देशात परिवर्तन घडवून आणले आहे. तोच कित्ता गिरवीत आता शहरातील आठही आमदार भाजप-शिवसेना महायुतीचे असतील यासाठी आपण चार महिने लक्ष केंद्रित करणार असल्याचे केंद्रीय वन-पर्यावरण आणि माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. भाजप कार्यालयामध्ये शहराध्यक्ष आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते जावडेकर यांचा सत्कार करण्यात आला. १९७१ मध्ये रामभाऊ म्हाळगी यांच्या निवडणुकीत केलेला प्रचार, आणीबाणीच्या काळात तुरुंगामध्ये अनिल शिरोळे यांच्याशी झालेली मैत्री अशा आठवणी जागवित जावडेकर यांनी शहर कार्यालय हे माझ्यासाठी चळवळीचे स्थान असल्याचे सांगितले. माझ्याकडे पाच खाती असून त्या माध्यमातून पुण्याच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. व्यक्तिगत नाही तर सार्वजनिक विकासाच्या फायली पाहणार आहे. अनिल शिरोळे यांच्यासमवेत महिन्यांतून किमान एकदा तरी जनता दरबार घेणार आहे. जनतेच्या पाठिंब्याचे प्रतिनिधी आहोत याची जाण असल्यामुळे आपल्याशी संपर्काचे मार्ग सदैव खुले असतील, असेही जावडेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2014 रोजी प्रकाशित
केंद्राकडील प्रलंबित प्रश्न सोडविणार
केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले वन आणि पर्यावरण विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत लवकरच बैठक घेणार...

First published on: 02-06-2014 at 02:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting with cm for pending issue by central