रेल्वे इंजिनावर चढलेल्या मनोरूग्णाकडून हल्ल
मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या इंजिनावर चढलेल्या मनोरुग्णाने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांवर हल्ला केला. जवानाकडील एके- ४७ रायफल हिसकावून त्याने गोळीबार करण्याची धमकी दिली. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मनोरुग्ण मृत्युमुखी पडल्याची घटना सासवड येथे बुधवारी पहाटे घडली.
सुरेश प्रेमसिंग पुरोहित (वय ३१, मूळ रा. बारमेर, राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे. पुरोहित हा मनोरुग्ण आहे. आठ वर्षांपूर्वी त्याने पत्नीचा खून केला होता. त्याच्याविरूद्ध राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पुरोहित राजस्थानातून बेपत्ता झाला होता. बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाली होती. सासवडनजीक असलेल्या राजेवाडी येथील सिग्नलला रेल्वेगाडी थांबली असताना अचानक पुरोहित महालक्ष्मी एक्सप्रेसच्या इंजिनावर चढला आणि त्याने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. इंजिन चालकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्याने गाडीतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांना माहिती दिली. जवानांनी इंजिनावर चढलेल्या पुरोहितला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याने जवानांना मारहाण करण्यास सुरूवात केली. झटापटीत त्याने एका जवानाकडील एके- ४७ रायफल हिसकाविली आणि जवानांवर रोखली. त्यानंतर एका जवानाने प्रत्त्युत्तरादाखल त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून एक गोळी पुरोहित याच्या दिशेने झाडली. गोळी लागल्याने पुरोहित जखमी झाला. त्याला रेल्वेगाडीतून पुण्यात आणण्यात आले. या घटनेची माहिती पुणे रेल्वे स्थानक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय परमार यांना देण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावला.