scorecardresearch

हिंजवडीसह सात गावांचे विलीनीकरण पिंपरी पालिका निवडणुकीनंतरच ?

हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, गहुंजे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे पिंपरी पालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

हिंजवडीसह सात गावांचे विलीनीकरण पिंपरी पालिका निवडणुकीनंतरच ?

पिंपरी : हिंजवडी व लगतच्या सात गावांचा पिंपरी महापालिकेत समावेश करून आगामी निवडणुकीसाठी त्या गावांसह प्रभागरचना केली जाईल, अशी शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे गावांच्या समावेशाचा बराच काळ रखडलेला विषय आता पिंपरी पालिकेच्या निवडणुकीनंतरच मार्गी लागेल, असे चित्र तूर्त दिसून येत आहे.

हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, गहुंजे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे पिंपरी पालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव कित्येक महिन्यांपासून राज्य शासनाकडे अंतिम निर्णयासाठी विचाराधीन आहे. यापूर्वी १९८२ मध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर , पिंपळे निलख, रहाटणी, सांगवी, थेरगाव, वाकड ही  गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतरच्या म्हणजेच १९८६ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत या गावांनाही सहभागी करून घेण्यात आले.

सप्टेंबर १९९७ मध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चºहोली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, दापोडी, बोपखेल, पुनावळे, किवळे, मामुर्डी, रावेत या गावांचे महापालिकेत विलीनीकरण करण्यात आले. मात्र, त्या वर्षात होणाऱ्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच उरकल्या होत्या. त्यामुळे या गावांमध्ये पाच वर्षानंतर म्हणजे २००२ मध्ये निवडणुका झाल्या. वाकडलगतच्या ताथवडे गावचा समावेश २००९ मध्ये पालिकेत झाला. त्या ठिकाणी २०१२ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगतची चाकण, देहू, आळंदीसह आणखी २० गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत होता. नंतर गावांची संख्या १४ पर्यंत खाली आली. बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सात गावांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. हा विषय राज्य शासनाकडे प्रलंबित आहे.

हिंजवडीसह या सात गावांच्या पट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या गावांच्या विलीनीकरणाचा विषय निवडणुकीपूर्वी मार्गी लावतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 20:41 IST