सत्तर हजार ग्राहकांकडून मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटरचे रीडिंग

पुणे : महावितरणची कोणतीही योजना किंवा सवलत मिळविण्यात पुणेकर वीजग्राहक सातत्याने आघाडीवर असतानाच टाळेबंदीेच्या कालावधीत आपल्या वीजमीटरचे रीडिंग स्वत:हून पाठविणाऱ्या ग्राहकांमध्येही पुणेकर राज्यात अव्वल ठरले आहेत. एप्रिल महिन्यातील वीजवापराबाबत  राज्यभरातून ३ लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मीटर रीडिंग पाठविले. त्यात सुमारे ७० हजार ग्राहक  पुणे विभागातील असून ही संख्या महावितरणच्या इतर परिमंडलांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर महावितरणने २३ मार्चपासून ग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे तात्पुरते बंद केले आहे. वीजबिलांची छपाई आणि त्याचे वितरणही बंद करण्यात आले आहे. मीटरचे रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येत आहे. मात्र, विजेचे अचूक बिल तयार करण्याच्या दृष्टीने महावितरणचे http://www.mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांनी स्वत:हून आपल्या मीटरच्या रीडिंगचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईलवर पाठविण्यात येणाऱ्या एसएमएसमध्येही मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या आवाहनाला राज्यातील ग्राहकांनी प्रतिसाद दिला असन, ३ लाख ६३ हजार ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत मीटरचे रीिडग पाठविले आहे.  पुणेकर ग्राहकांनी राज्याच्या इतर ग्राहकांच्या तुलनेत या प्रक्रियेला सर्वाधिक प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत ग्राहकांनी अचूक बिलासाठी रीिडगचे छायाचित्र पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.