लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुणे मंडळाने चालू वर्षी जानेवारी महिन्यात सहा हजारांहून अधिक सदनिकांसाठी नूतन संगणक प्रणाली इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे (आयएचएलएमएस) सोडत काढण्यात आली. या सोडतीचा निकाल जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी होत आला, तरी विजेत्यांना देयकरार पत्र वितरित करण्यात आलेले नाही.
म्हाडा पुणे महामंडळाने जानेवारी महिन्यात सोडत जाहीर केली. मानवी हस्तक्षेप विरहित, कमी वेळेत आणि पारदर्शक निकाल लावण्यासाठी म्हाडाकडून नव्या संगणकप्रणालीद्वारे प्रथमच सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार सदनिकेसाठी अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे जोडायची होती. मात्र, पहिल्या दिवसापासून प्रणालीत कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांना अडचणी आल्या. त्यामुळे म्हाडाच्या यंदाच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तसेच आता निकाल जाहीर झाल्यानंतरही विजेत्या झालेल्या नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. सोडतीचा निकाल २० मार्चला जाहीर झाला असून दहा टक्के रक्कम अदा केल्यानंतरही विजेत्यांना देयकरार पत्र देण्यात आलेले नाही.
आणखी वाचा-पिंपरी महापालिकेच्या सहशहर अभियंत्याला महापालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस
सोडतीचा निकाल जाहीर झाला असून विजेत्यांची कागदपत्रे संगणकीकृत करण्यात आली आहेत. मात्र, काही ठरावीक विजेत्या अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्यांना संपर्क साधून आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्याचे आवाहन केले असल्याचे संगणकप्रणालीच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली असून १५४८ विजेत्यांची यादी म्हाडाला प्राप्त झाली आहे. मात्र, विजेत्यांनी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे, याबाबत कंपनीकडून माहिती दिली जात नसल्याने पुढील प्रक्रिया थांबली आहे. भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये, म्हणून म्हाडाला कागदपत्रांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. -व्ही. एस. ठाकूर, व्यवस्थापक, म्हाडा पुणे मंडळ