दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीत सापडणाऱ्या ‘मेलामाइन’ या रासायनिक घटकासाठी ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी’ने (एफएसएसएआय) सोमवारी निकष प्रसिद्ध केले आहेत. दुधात पाणी मिसळून ते वाढवताना दुधातील प्रथिनांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे प्रथिने अधिक असल्याचे भासवण्यासाठी मेलामाइनची भेसळ होत असल्याचे जागतिक स्तरावर आढळून आले आहे.
मेलामाइनसाठीच्या नवीन निकषांनुसार लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या पावडर स्वरूपातील खाद्यात त्याचे प्रमाण आता प्रति किलोमागे १ मिलिग्रॅम, बाळांसाठीच्या द्रवस्वरूपातील खाद्यात किलोमागे ०.१५ मिलिग्रॅम (म्हणजेच पार्ट्स पर मिलियन) आणि इतर खाद्यपदार्थामध्ये किलोमागे २.५ मिलिग्रॅम असे निश्चित करण्यात आले आहे. दुधात मेलामाइनची भेसळ झाल्यास त्यातील दुधातील नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे दुधातील प्रथिनांचे प्रमाण अधिक दिसून येते.
दुधभेसळीसह लहान बाळांचे पावडर खाद्य, फ्रोझन योगर्ट, दुधापासून बनवलेली कॅन वा बाटलीबंद अशा पदार्थामध्ये मेलामाइनची भेसळ होण्याची शक्यता असते. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मेलामाइन भेसळीच्या परिणामांबाबत माणसांवर चाचण्या झाल्या नसल्या, तरी प्राण्यांमध्ये मेलामाइन पोटात गेल्यास मूतखडा (ब्लॅडर स्टोन) होण्याची शक्यता असते. मेलामाइनच्याच पावडरमध्ये ‘सायानुरिक आम्ल’ही असू शकते व त्यामुळे मेलामाइनचे खडे होऊ शकतात. या कारणामुळेही ते मूतखडय़ास तसेच मूत्रपिंडाचे कार्य बिघडण्यास कारणीभूत ठरू शकते. तसेच प्राण्यांमध्ये मेलामाइनचे कर्करोगजन्य परिणामही दिसून आले आहेत.
—
‘मेलामाइनच्या अन्नपदार्थातील प्रमाणाबाबत आतापर्यंत निकष नव्हते व खाद्यपदार्थामध्ये मेलामाइनला बंदीच होती. मेलामाइन आढळण्याच्या अनुषंगाने चीनमधून येणाऱ्या चॉकलेट्स व दूध पावडरीवर बंदी घालण्यात आली. परंतु खतांच्या माध्यमातून देखील मेलामाइन नैसर्गिक रीत्या खाद्यपदार्थामध्ये येते. त्यामुळे अशा प्रकारे नैसर्गिक रीत्या किती मेलामाइन पदार्थात असू शकते यासंबंधी प्रथमच ५ जानेवारीपासून निकष लागू झाले आहेत.’
– दिलीप संगत, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2016 रोजी प्रकाशित
दूध व दुग्धजन्य पदार्थामधील ‘मेलामाइन’ घटकाच्या प्रमाणासाठी निकष!
प्रथिने अधिक असल्याचे भासवण्यासाठी मेलामाइनची भेसळ होत असल्याचे जागतिक स्तरावर आढळून आले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-01-2016 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk milk products melamine criteria elements scale