पुणे महानगरपालिकेतील पराभवानंतर आता एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यासाठी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जुबेर बाबू यांनी आमदार इम्तियाज जलील यांना जबाबदार धरत त्यांच्यावर थेट उमेदवारांकडून पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षासाठी चांगले वातावरण होते. परंतु आमदार इम्तीयाज जलील यांनी उमेदवाराकडून दहा लाख रुपयांची मागणी केल्याने शहरातील वातावरण दूषित झाले. याचा फटका पक्षाला बसला. त्यांच्या या भूमिकेमुळे पराभवाला पक्षाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी पराभवाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी शहर अध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी केली आहे. आपण या सर्वाची तक्रार पक्ष श्रेष्ठीकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याविषयी शेख म्हणाले की,आमदार जलील यांना निवडणुकीपूर्वी अनेक वेळा फोन केला. मात्र त्याला एकदाही त्यांनी उत्तर दिले नाही अथवा  शहरातील परिस्थितीबाबत विचारले नाही. ते फक्त निवडणुकीच्या दरम्यान पाच  दिवस अगोदर याठिकाणी आले होते. त्यांच्या या कार्यपध्दतीचा पक्षाला फटका बसला आहे. त्यांनी पुण्याकडे लक्ष दिले असते, तर अनेक जागा निवडून आल्या असत्या. मात्र त्यांनी तसे काही केले नाही, असे जुबेर बाबू यांनी म्हटले. शहरात ज्या दोन सभा झाल्या त्यासाठी संपूर्ण खर्च मी एकट्यानेच केला. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी मला मदत करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही. या निवडणुकीत माझ्यासह अनेकांवर त्यांनी अन्याय केल्याचाही आरोप जुबेर बाबू यांनी केला. येरवडयातील जागा पक्षाच्या वैयक्तिक कामामुळे निवडून आल्याचे जुबेर बाबू यांनी सांगितले.