लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: प्रियकराशी भेट घडवण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची मध्यप्रदेशात पन्नास हजार रुपयांत विक्री करण्यात आली आणि तिला धमकावून एकाशी विवाह लावून देण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी मध्यप्रदेशातील एका गावातून मुलीची तीन महिन्यांनी सुटका केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीची ५० हजार रुपयात विक्री करणारी महिला आणि अल्पवयीन मुलीच्या पतीला पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी शांती ऊर्फ सन्तो हरनाम कुशवाह (वय ४०, रा. पुणे, मूळ गिरवासा, जि. भिंड, मध्यप्रदेश) आणि धर्मेंद्र किलेदारसिंग यादव (वय २२, रा. ग्यारा, जि. दतिया, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या विरुद्ध फसवणूक, अपहरण, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, बालविवाह आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा- पुणे: हडपसरमध्ये चार वर्षांच्या मुलीचा आईकडून चाकूने भोसकून खून
१४ वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी १७ जानेवारी रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली होती. मुलीचे आई-वडील मजुरी करतात. अल्पवयीन मुलगी मध्यप्रदेशात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात यांच्या पथकाला मिळाली. थोरात, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, पोलिस शिपाई सागर कोंडे आणि पूजा लोंढे आदींचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. अल्पवयीन मुलगी ग्यारा या गावात असून तिचे धर्मेंद्र याच्याशी जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची माहिती स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिळाली. पोलिसांनी धमेंद्रच्या घरात छापा टाकून मुलीची सुटका केली. अल्वपयीन मुलगी सुखरूप असून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी या वेळी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीला फूस
अल्पवयीन मुलीची बहीण एका खासगी कंपनीत काम करते. या कंपनीतील एकाशी तिचे प्रेम जुळले.आरोपी शांती याच कंपनीत काम करत होती. तिची धमेंद्र याच्याशी ओळख आहे. विवाहासाठी मुलगी घेऊन आलीस तर पन्नास हजार रुपये देतो, असे धमेंद्रने तिला सांगितले होते. अल्पवयीन मुलीचा मित्र गावी गेला होता. त्यानंतर शांतीने बनाव रचला. तुझा मित्र मध्यप्रदेशात गेला आहे. त्याने तुला विवाहासाठी बोलवले आहे, असे सांगून तिला फूस लावली. आरोपी शांती अल्पवयीन मुलीला घेऊन मध्यप्रदेशात गेली. त्यानंतर २३ जानेवारी रोजी तिचा धमेंद्रशी जबरदस्तीने विवाह करण्यात आला. आरोपी धमेंद्रने शांतीला पन्नास हजार रुपये दिले. या प्रकाराची कोणाला माहिती दिली तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारून टाकू, अशी धमकी मुलीला देण्यात आली.