आमदार अनंत गाडगीळ यांचे पदाधिकाऱ्यांना पत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाच्या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षाच्या नेत्यावर व्यक्तिगत आरोप करायचे आणि दुसऱ्या दिवशी गप्प रहायचे, पक्षाचा प्रवक्ता असतानाही स्वत:चीच प्रसिद्धी करायची, प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाला स्वत:च्या खासगी मालमत्तेचे स्वरूप द्यायचे, असे प्रकार पक्षातील एका प्रवक्त्याकडून सुरू झाल्यामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रमात पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जाण्यापासून पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते, आमदार अनंत गाडगीळ गेल्या काही महिन्यांपासून दूर झाले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून गेली अनेक वर्षे दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी गाडगीळ जात होते, अलीकडे मात्र ते प्रवक्ते म्हणून का दिसत नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. गाडगीळ यांच्याकडेही अनेकांनी त्याबाबत विचारणा केली असून या पाश्र्वभूमीवर गाडगीळ यांनी एक पत्र काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रातून पक्षाच्या सद्य:स्थितीवर त्यांनी कठोर टीका केली असून माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नाही असा अर्थ मी या सर्व प्रकारातून काढायचा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला सध्या कशा प्रकारची वागणूक दिली जात आहे, हे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टपणे मांडण्याची वेळ आली आहे, अशीही भावना गाडगीळ यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

गेल्या तेरा वर्षांत माझ्या विधानाने पक्ष अडचणीत आला असे एकदाही घडलेले नाही, विरोधी पक्षाच्या नेत्यावर व्यक्तिगत आरोप करून नंतर गप्प राहिलो असे मी प्रवक्ता म्हणून कधी केले नाही, प्रदेशाध्यक्षांची पत्रकार परिषद सुरू असताना प्रवक्ता म्हणून त्यात काही विधाने न करण्याचा संकेतही मी कायम पाळला, पदापेक्षा प्रवक्त्याला प्रसिद्धी हा पायंडा कधीही पाडला नाही आणि प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाला मी स्वत:ची खासगी मालमत्ता असल्याचे स्वरूप येऊ दिले नाही, अशा शब्दांत गाडगीळ यांनी विद्यमान प्रवक्त्याचे नाव न घेता या पत्रातून टीका केली आहे.

कार्यकर्त्यांची शिबिरे, पदाधिकाऱ्यांसाठी बैठका, कार्यकर्त्यांचे प्रबोधन असे सर्व प्रकारचे महत्त्वाचे कार्यक्रम पक्षाने बंद केले आहेत. पुण्यात झालेल्या पराभवाबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. पक्षाच्या बैठकांबाबत मला अंधारात ठेवण्यात आले. या बैठका काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्याऐवजी काही नेत्यांच्या घरी आयोजित करण्यात आल्या. त्यातून मतदारांना चुकीचा संदेश गेला, याकडेही गाडगीळ यांनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla anant gadgil criticized congress offical
First published on: 23-07-2017 at 02:38 IST