पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे आहेत ते देशातल्या जनतेशी खोटं बोलतात अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी केरळच्या एका प्रचारसभेत ही टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खुलं आव्हानही दिलं आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १०० टक्के खोटारडे आहेत. तुम्हाला वाटेल मी असं का बोलतो आहे. पण तुम्हीच आठवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय आश्वासनं दिली होती? प्रत्येकाला १५ लाख देणार असं आश्वासन दिलं होतं. तुम्हाला मिळाले का १५ लाख रुपये? दोन कोटी रोजगार संधी दरवर्षी निर्माण करु म्हणाले होते, झाले का? १० वर्षात २० कोटी नोकऱ्या त्यांनी निर्माण केल्या का? मग हा खोटारडेपणा नाही तर काय?” असा सवाल खरगेंनी केला आहे. तसंच मोदींना त्यांनी एक आव्हानही दिलं आहे.
हे पण वाचा- “…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?
मोदींमध्ये हिंमत असेल तर..
“मी मोदींना आव्हान देतो, त्यांच्यात जर हिंमत असेल आणि त्यांना जर देशातल्या गरीबांची चिंता असेल देशातली न्याय व्यवस्था समान पातळीवर आणायची असेल तर त्यांनी अशा भाजपा नेत्यांची हकालपट्टी करावी जे सांगतात आम्ही सत्तेवर आलो तर संविधान बदलू. मोदी ही कारवाई करण्याची हिंमत दाखवतील का?” असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी विचारला आहे.
हे पण वाचा- उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसला मतदान करणार, लोकसभा निवडणुकीतल्या मतदारसंघाचं चित्र काय?
मागच्या वर्षी मोदींनी १४ विदेशवाऱ्या केल्या पण मणिपूरला गेले नाहीत
सबका साथ सबका विकास हा नारा मोदींनी सत्तेवर आल्यावर दिला होता. त्यांना सबका साथ तर मिळाला पण त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केला आहे. हिंदू महासभा आणि जनसंघ यांनी सुरुवातीला आणि नंतर भाजपाने संघाने देशात फूट कशी पडेल यावरच लक्ष्य केंद्रीत केलं. हिंदू महासभा आणि जनसंघाने तर ब्रिटिशांची मदत केली. मात्र आता काही लोक म्हणत आहेत की ते देशभक्त होते आणि काँग्रेसने काही केलं नाही. मागच्या वर्षभरात मोदींनी १४ देशांचा दौरा केला. शेकडो सभा घेतल्या. पण ते मणिपूरला गेले नाहीत. मणिपूर जळत होतं, तिथल्या स्त्रिया आक्रोश करत होत्या, घरं पेटवली जात होती पण त्यांना मणिपूरला आपल्या देशातल्या एका राज्यात जावं असं मुळीच वाटलं नाही असंही खरगे म्हणाले.