पुणे : ‘पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तुटून होणारे अपघात टाळण्यासाठी पुणे महापालिकेने खासगी जागेतील फांद्या सवलतीच्या दरात तोडून द्याव्यात,’ अशी मागणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली. महापालिकेला याबाबत राज्य सरकारने स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही शिरोळे म्हणाले.

शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे कर्वेनगर येथील खासगी जागेतील झाड पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. याबरोबर पावसाळ्यात झाडाच्या धोकादायक फांद्या पडून रस्ते बंद होणे, वाहतूक कोंडी होते, फांद्यामुळे वाहनांचे नुकसान होणे, असेही प्रकार घडत आहेत, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी सभागृहात दिली. महापालिका धोकादायक झालेल्या फांद्या तोडते. मात्र, खासगी जागेतील झाडांच्या फांद्या तोडायच्या झाल्यास जागा मालकाला महापालिकेची परवानगी घेऊन स्वत: फांद्या तोडाव्या लागतात.

महापालिकेकडून परवानगी मिळण्यामध्ये उशीर होतो. तसेच खासगी ठेकेदाराकडून झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्यासाठी अनेकदा ठेकेदार अधिक शुल्क घेतो. या करिता राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन खासगी जागेतील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी सवलतीच्या दरात शुल्क घ्यावे, महापालिकेने याबाबत नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी विधानसभेच्या सभागृहात आमदार शिरोळे यांनी केली.

शहरातील धोकादायक झालेल्या झाडांची तसेच फांद्या तोडायच्या झाल्यास त्यासाठी नागरिकांना पुणे महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. यापूर्वी महापालिकेचे सभागृह अस्तित्वात असल्याने नागरिकांना वृक्ष प्राधिकरण समिती कडे अर्ज करून धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्याची परवानगी मिळत होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने सर्व कारभार हा प्रशासनाच्या ताब्यात गेला आहे. महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे नागरिकांना महापालिका प्रशासनाकडे अर्ज करून झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी घ्यावी लागते.

महापालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज करून ही परवानगी दिली जात होती. मात्र आता नागरिकांना उद्यान विभागात हेलपाटे मारावे लागू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या अधिकारात धोकादाय झालेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी मिळते. शहरातील रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक जागेत असलेली आणि धोकादायक झालेल्या झाडांच्या फांद्या महापालिकेकडून तोडल्या जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र जी झाडे सोसायटीच्या आवारात आहेत. त्यासाठी संबंधित सोसायटीतील पदाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. धोकादायक फांद्या तोडण्याचा अर्ज महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतात. संबंधित वृक्षाचा आकार किती फांद्या धोकादायक आहे त्याची माहिती घेऊन या फांद्या किती प्रमाणात तोडाव्यात याची परवानगी देते. त्यानंतर नागरिकांना पदरच्या खर्चातून ठेकेदारामार्फत हे काम करून घ्यावे लागते. यामध्ये मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत.