पुणे : हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवणाऱ्यांनी लोकशाही धोक्यात आणली. भाजपचे नेते घटना बदलण्याची भाषा बोलत असल्याने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील मतदानामध्ये मोदीविरोधी लाट दिसून आली. मत मागायला जाणार नाही म्हणणारे मतासाठी गल्लोगल्ली फिरत रस्त्यावर आले. विदर्भात सुरू झालेली भाजप सरकार विरोधाची लाट आता देशभरात पोहोचल्याचे सांगत नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला. पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ठाकरे बोलत होते. आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते.

विदर्भात दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. मात्र, मोदी सरकार विरोधी लाट दिसून आली. जनता विरुद्ध सरकार, अशी ही निवडणूक आहे. पहिल्यांदाच असे चित्र पाहायला मिळत आहे. तिसऱ्या टप्प्यातही तेच चित्र दिसले. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर मत मागणाऱ्यांना गल्लोगल्ली फिरावे लागले, ही राज्यघटनेची ताकद आहे. मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे ते १७०-१८० जागा गाठू शकणार नाही, अशी स्थिती आहे, असा दावा ठाकरे यांनी केला. पुण्यातही काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार

राहुल गांधी समाजासाठी बोलू लागल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा द्वेषमूलक भाषा वापरू लागले. या भाषेतून निवडणूक हरण्या-जिंकण्यापेक्षा देशाच्या एकात्मतेला धक्का लावत आहेत. लबाड्या न केल्यास भाजपच्या जागा १५० पेक्षा कमी होतील. मोदींनी दहा वर्षांत सार्वजनिक आरोग्याची दारूण अवस्था केली आहे. आयुष्मान भारतचे कार्ड कुठे चालते दाखवावे. करोना काळातील गरिबांचे मरणेही या सरकारने नाकारले, अशी टीका डॉ. वैद्य यांनी केली. निवडणुकीतून मोदींचे सरकार नक्की जाणार आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी मार खाल्ला आहे. काँग्रेसचे सरकार आले तर काय, ही भाषा भाजपला बोलावी लागत आहे. झोळी घेऊन निघून जाईन, असे मोदींनी सांगितले होते, पण त्यांना ३०० लाख कोटींचा हिशेब दिल्याशिवाय जाता येणार नाही. न्यायसंस्थेने घटनेनुसार काम केल्यास देश बदलू शकतो, शोषणमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. सरकार सर्व कायदे, स्वायत्तता पायदळी तुडवत आहे. नवा कायदा सर्वोच्च न्यायालयाचे दात काढून घेणार आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली.