पुण्यातील सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गेल्या सहा महिन्यात शहरातील २३ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
शिवराज शंकर शिंदे (वय ३४, मूळ रा. उपळाई रोड, बार्शी, सध्या रा. नऱ्हे), मनोज बाळु चांदणे (वय २३) निखील अरुण इंगळे (वय २३, रा. दोघे रा. पानमळा, सिंहगड रस्ता),संजय बाळू चव्हाण (वय २१ रा. धायरी फाटा) अशी कारवाई करणयात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
शिंदे आणि साथीदारांनी सिंहगड रस्ता परिसरात गंभीर गुन्हे केले. शिंदे आणि साथीदारांच्या विरोधात मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तयार केला. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावाची पडताळणी करुन मंजुरी देण्यात आली.