पुणे : अचानक वाजलेला भोंगा… त्यानंतर कृत्रिम पद्धतीने झालेले स्फोट… अश्रूधुरांच्या फोडण्यात आलेल्या नळकांड्या… इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांची ‘एनडीआरएफ’ने केलेली सुटका अन् आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद, अशी माॅक ड्रिलची सर्व प्रक्रिया २५ ते साठ मिनिटांत बुधवारी शहरी आणि ग्रामीण भागांत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्वरित करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सराव (माॅक ड्रिल) बुधवारी शहर आणि ग्रामीण भागांतील सहा ठिकाणी करण्यात आला. पुण्यातील विधान भवन, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, वनाज औद्योगिक परिसर, मुळशीतील पंचायत समितीचे कार्यालय, तळेगाव नगरपरिषदेच्या परिसरात दुपारी चारच्या सुमारास माॅक ड्रिल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केले होते.
माॅक ड्रिलपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतूर, एनसीसी पुणे मुख्यालयाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल निशाद मंगरूळकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
युद्धजन्य परिस्थिती उद्धभवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून माॅक ड्रिल घेण्यात आली. माॅक ड्रिलचे गांभीर्य लक्षात घेऊन यंत्रणांनी शिस्तबद्धपणे काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केली होती.
विधानभवन येथे विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त अरूण आनंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.
मॉक ड्रिलमध्ये काय केले?
– माॅक ड्रिलमध्ये प्रारंभी भोंगा वाजविण्यात आला.
– त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आले. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
– इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
– आरोग्य विभाग, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलांनी समन्वय राखून माॅक ड्रिल यशस्वी केले.
– पंचवीस ते साठ मिनिटांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जनजागृतीसाठी स्थानिक नागरिकांचा समावेश
ग्रामीण भागातील लोकांमध्ये माॅक ड्रिलद्वारे जनजागृती करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. शहरी आणि ग्रामीण भागातील सहाही ठिकाणी एकाच वेळी दुपारी चार वाजता माॅक ड्रिल घेतले. संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेड क्राॅस सोसायटीसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग नोंदविला.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार दक्षता म्हणून शहर आणि ग्रामीण भागात सहा ठिकाणी माॅक ड्रिलची यशस्वी कार्यवाही करण्यात आली. सर्व यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद आणि समन्वय राखून माॅक ड्रिल यशस्वी केले. ही सर्व प्रक्रिया २५ ते ६० मिनिटांत पूर्ण झाली. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
माॅक ड्रिलमुळे विविध यंत्रणांमधील समन्वय दृढ झाला असून, आपत्कालीन परिस्थिीती हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. प्रत्यक्ष संकटादरम्यान तयारीसाठी आत्मविश्वास वाढला आहे. – देवेंद्र फोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए