पुणे : राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुण्यातील मुख्यालयात करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहजिल्हा निबंधक वर्ग एक, सहजिल्हा निबंधक वर्ग दोन, लेखाधिकारी अशी पदे करार पद्धतीने भरली जाणार आहेत. नोंदणी विभागात एकीकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने भरती करण्याची मागणी होत असतानाच नव्याने भरती करण्याऐवजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच पायघड्या घालण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात आता महसूल विभागातून निवृत्त झालेल्या ६५ वर्षांखालील अधिकाऱ्यांची विविध कामांसाठी करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. विभागाच्या संकेतस्थळावर याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सहजिल्हा निबंधक वर्ग एक आणि दोन या पदांसाठी प्रत्येकी दोन, तर लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी यांची १२ या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी राज्य शासकीय सेवेतून सहजिल्हा निबंधक वर्ग एक किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले, तर सहजिल्हा निबंधक वर्ग दोनसाठी सह दुय्यम निबंधक वर्ग दोन किंवा मुद्रांक उपअधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. या दोन्ही पदांवर घेण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व नोंदणी अधिनियमातील तरतुदी, अपील प्रकरणे आणि पुनरावृत्ती प्रकरणे हाताळणे, रिट याचिकेतील परिच्छेदानुसार उत्तर तयार करणे आदी कामे करावी लागणार आहेत.
हेही वाचा – पुणे : नवले पूल परिसरात पुन्हा अपघात ; टँकरची सात ते आठ वाहनांना धडक
या पदांसाठी १२ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्यांना बुधवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे, असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.