केंद्रातील मोदी यांचे सरकार सर्वच बाबतीत आम आदमीच्या विरोधात असून केंद्र आणि राज्य शासनाने पुण्याला सातत्याने दुय्यम वागणूक दिली असल्याची टीका काँग्रेसतर्फे सोमवारी करण्यात आली. सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे मंगळवारी (२६ मे) निदर्शने आणि धरणे धरण्याचाही कार्यक्रम केला जाणार आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केंद्रातील सरकारवर टीका करत या सरकारने पुण्यासाठी कोणतीही ठोस योजना वर्षभरात दिली नाही, असे सांगितले. छाजेड म्हणाले, की यूपीए सरकारच्या काळात नेहरू योजनेअंतर्गत पुणे शहराला दोन हजार कोटींचा निधी मिळाला होता. निवडणुकीत भाजपचा एक खासदार आणि आठ आमदार या शहराने निवडून दिले; पण त्यांच्याकडून अपेक्षापूर्ती मात्र झालेली नाही. पुण्याबरोबरच नागपूरचा मेट्रो प्रकल्प दाखल झालेला असताना नागपूर मेट्रोला मंजुरी देण्यात आली. पुण्याच्या मेट्रोला मात्र वर्षभरात मंजुरी मिळू शकलेली नाही. पर्यावरणमंत्री पुण्याचे असतानाही वर्षभरात नदी सुधारणा योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर होऊ शकलेला नाही.
रेल्वेच्या अंदापत्रकात पुण्याला निधी मिळणे आवश्यक असताना मेट्रोखेरीज अन्य योजनांना निधी मिळालेला नाही. कॅन्टोन्मेंटच्या प्रश्नांबाबत आश्वासन मिळाल्यानंतरही ठोस कार्यवाही झालेली नाही. स्मार्ट सिटीचे निकष वर्षभरात तयार होऊ शकलेले नाहीत. टोलबाबतही निश्चित धोरण अद्याप सरकार तयार करू शकलेले नाही, असेही छाजेड यांनी सांगितले. या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शहर काँग्रेसतर्फे मंगळवारी नरपतगिरी चौकात सकाळी अकरा वाजता निदर्शने केली जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
एकही विषय मार्गी लागला नाही – वंदना चव्हाण
पुणे शहराच्या प्राधान्यक्रमावर असलेला एकही विषय वर्षभरात मार्गी लागलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. पुण्याच्या मेट्रोला ती भुयारी करायची का उंचावरून जाणारी करायची याबाबत खासदारांनी खो घातला. शहराच्या कोणत्याच प्रश्नात त्यांनी लक्ष घातलेले नाही. तसेच शहराच्या अनेक प्रश्नांबाबत त्यांनी कोणतीही भूमिका देखील घेतलेली नाही, असे त्या म्हणाल्या. पालकमंत्र्यांच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया विचारली असता आमचे पालकमंत्री (अजित पवार) खूपच कार्यक्षम होते, त्यामुळे विद्यमान पालकमंत्र्यांशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. अनेक प्रश्न सोडवण्यात सध्याचे पालकमंत्री नक्कीच कमी पडले आहेत, असे त्या म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2015 रोजी प्रकाशित
केंद्र सरकारकडून पुण्याला सातत्याने दुय्यम वागणूक
केंद्रातील मोदी यांचे सरकार सर्वच बाबतीत आम आदमीच्या विरोधात असून केंद्र आणि राज्य शासनाने पुण्याला सातत्याने दुय्यम वागणूक दिली असल्याची टीका काँग्रेसतर्फे सोमवारी करण्यात आली.

First published on: 26-05-2015 at 03:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi govt congress ncp metro