नारायणगाव : पंधरा दिवसांच्या पोटच्या नवजात मुलीचे अपहरण झाल्याचा आईने बनाव केल्यानंतर, आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने कसून तपास केल्यावर आईनेच आपल्या नवजात मुलीला आळेफाटा जवळील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातील वाहत्या पाण्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आळेफाटा (ता. जुन्नर) परप्रांतीय महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवार (दि. ३) रोजी सकाळी आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या १५ दिवसांच्या नवजात मुलीला डोस दिला. यानंतर नगर-कल्याण महामार्गाने घरी येत असताना समोरून चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात इसमांनी नवजात मुलीचे अपहरण करून पलायन केल्याची तक्रार दुपारी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल केली. आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी तपासाची चक्रे फिरवली. महिलेने तक्रारीत सांगितलेल्या घटनाक्रमाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असता महिलेच्या बोलण्यात विसंगती दिसल्याने पोलिसांना या महिलेवरच संशय आला. अधिक तपास केला असता नवजात बालकास परिसरातून जाणाऱ्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यात टाकल्याची कबुली या महिलेने दिली.

हेही वाचा – कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार रविंद्र धंगेकरांनी शरद पवारांची घेतली भेट; म्हणाले,” मला उमेदवारी दिल्यास..”

हेही वाचा – “मी निवृत्ती महाराज इंदोरीकरांना एवढाच इशारा देऊ इच्छितो”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर उपस्थितांमध्ये पिकला हशा

आळेफाटा पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आळेफाटा पोलीस व जुन्नर रेस्क्यू टिमचे सदस्य पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यात टाकलेल्या नवजात मुलीचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.