महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता गजाआड

लाचेचा मलिदा खाण्यास चटावलेले शासकीय कर्मचारी बऱ्याच वेळा लाचेपोटी पैसे मागतात. परंतु महावितरणच्या वडगांव मावळ येथील सहायक अभियंत्याने चक्क लाचेपोटी पंखा मागितल्याची घटना उघडकीस आली. इलेक्ट्रिक कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून पंखा घेणाऱ्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गजाआड केले.

रमेश संभाजी हिंगलकर असे लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे. हिंगलकर हे महावितरणच्या वडगांव मावळ येथील महावितरणच्या कार्यालयात सहायक अभियंता आहेत. एका इलेक्ट्रिक ठेकेदाराने वीजमीटर बसविण्यासाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. ठेकेदाराने ग्राहकांचे मीटर जोडणीसाठी लागणारे पैसे चलन स्वरूपात भरले होते. मीटर बसविण्याचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी

हिंगलकर यांनी ठेकेदाराकडे छताला बसविण्यात येणाऱ्या पंख्याची मागणी केली. त्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव मावळ येथील महावितरणच्या कार्यालयात मंगळवारी सापळा रचण्यात आला. ठेकेदाराकडून पंखा घेणारे सहायक अभियंता हिंगलकर यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध वडगांव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ग्रामसेवक आणि लिपिकाला पकडले

ग्रामपंचायतीकडून वीजमीटर बसविण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी वडगांव मावळ येथील वराळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि लिपिकाने चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामसेवक आणि लिपिकाला चाळीस हजारांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ग्रामसेवक गोविंद मारुती जाधव (वय ४२, रा. देहूफाटा) आणि लिपिक शंकर तानाजी दाभाडे (वय ३०, रा. वराळे, ता. वडगांव मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या संदर्भात वराळे गावातील एका रहिवाशाने तक्रार दिली होती. त्याला महावितरणकडून वीजमीटर बसविण्यासाठी ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी जाधव आणि दाभाडे यांनी चाळीस हजार रुपये मागितले होते.