वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) आकारणीसह तिकीट दराची निश्चिती करताना मल्टिप्लेक्सचालकांची कसरत झाली आहे. प्रत्येक खेळाचे वेगवेगळे दर आणि सुट्टय़ा पैशांचा प्रश्न उद्भवू नये यासाठी तिकिटांचे दर ठरविण्यात आले आहेत. त्या तुलनेत एकपडदा चित्रपटगृहाचे कामकाज जीएसटी कर आकारणीसह सुरळीत झाले आहे.
शनिवारपासून जीएसटी लागू झाला असून त्याचे प्रतिबिंब चित्रपटांच्या तिकीट दरामध्ये उमटले आहे. एकपडदा चित्रपटगृहांचे तिकीट दर शंभर रुपयांपेक्षा कमी असल्याने त्यांना १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. विजय चित्रपटगृहामध्ये सध्या अप्पर स्टॉलसाठी ७० रुपये तर, बाल्कनीसाठी ८० रुपये असा तिकीट दर आकारला जात आहे. पूर्वीच्या करमणूक कर आणि सेवा कराची जागा आता जीएसटीने घेतली आहे. त्यामुळे तिकीट दरामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. अप्पर स्टॉलसाठी ५९.३० रुपये तसेच राज्याचा आणि केंद्राचा जीएसटी प्रत्येकी ५.३५ रुपये असा तिकीट दर आहे. तर, बाल्कनीसाठी ६७.८० रुपये तसेच राज्याचा आणि केंद्राचा जीएसटी प्रत्येकी ६.१० रुपये असा ८० रुपये तिकीट दर आहे, अशी माहिती दिलीप निकम यांनी दिली.
प्रत्येक खेळाचे वेगवेगळे दर आणि सुट्टय़ा पैशांचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मल्टिप्लेक्समध्ये तिकिटाच्या दराची आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती सिटी प्राईडचे प्रकाश चाफळकर यांनी दिली. एखाद्या खेळाचे तिकीट २०० रुपये असेल तर, त्यातील चित्रपटगृहाचा वाटा १५६.२४ रुपये तर, राज्याचा आणि केंद्राचा जीएसटी प्रत्येकी २१.८८ रुपये आहे. तर, दुसऱ्या खेळाचे तिकीट ११५ रुपये असेल तर त्यातील चित्रपटगृहाचा वाटा ९७.४५ रुपये असून राज्याचा आणि केंद्राचा जीएसटी प्रत्येकी ८.७७ रुपये आहे. जीएसटीसकट तिकीट दराची निश्चिती पाच किंवा दहाच्या पटीत करण्याबाबत निर्णय झाला तर, शनिवारपासून आकारण्यात येत असलेल्या तिकीट दरामध्ये काहीसा फरक पडू शकेल, असेही चाफळकर यांनी सांगितले.
पाच दिवसांनंतर निर्णय
चित्रपटांसाठी शंभर रुपये आणि त्यावरील तिकिटाबाबतचा शासकीय अध्यादेश अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनाच मिळालेला नाही. तो आमच्या हाती आलेला नाही. शंभर रुपये आणि त्यावरील तिकिटावर १८ टक्के तर, २०० रुपयांवरील तिकिटावर २८ टक्के जीएसटी असल्याचे कळते. सध्या तरी पुण्यातील काही चित्रपटगृहे ९० रुपये तर, काही चित्रपटगृहे शंभर रुपये दर आकारतील. पाच दिवस काय परिस्थिती होते हे पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पुणे थिएटर ओनर्स (एक्झिबिटर्स) असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मोहोळ यांनी सांगितले. जीएसटीसह काही स्थानिक कर लागले तर आम्ही चित्रपटगृहे बंद ठेवू या भूमिकेवर शनिवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.