पुणे : पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे.  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ( सीआयएसएफ) जवानांच्या नियुक्तीनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केली.

नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु होती.

हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेला अतिवृष्टीचा फटका… पण लगेचच उपाययोजना!

याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की, सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल होत असून नव्या टर्मिनलमध्ये इनलँड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याची तांत्रिक ही प्रक्रिया वेगाने सुरु असून लवकरात लवकर ती पूर्ण केली जाईल. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १४ जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिला बोर्डिंग पास केंद्रीय मंत्री मोहोळ देणार !

नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या प्रवाशाला १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित करणार आहेत.