पवळे चौकातील जी. जी. ज्वेलर्स येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी शुक्रवार पेठेत स्वराज्य मित्र मंडळाच्या वर्गणीवरून झालेल्या भांडणातून एकाचा खून करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, सत्तूर असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खून केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेच्या खर्चासाठी दरोडा टाकून रक्कम उभी करण्याची आरोपींची योजना होती.
रेमंड जोसेफ क्लिंच (वय ३९, रा. आंग्रेवाडा, शाहू चौक), विठू रामदास कुंजीर (वय २२, रा. शुक्रवार पेठ), बाळा नंदकुमार ओसवाल (वय २८, रा. बिबवेवाडी गावठाण), प्रसाद अनंत गांडले (वय ३६, रा. दत्तनगर, आंबेगाव), संजय अनंत काकडे (वय ३९, रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वाना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेश बामगुडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, की  कसबा पेठेतील जी जी ज्वेलर्स येथे पांढऱ्या रंगाच्या कारमधून दरोडा टाकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गीता बागवडे व कर्मचारी यशवंत ओंबासे, सुनील पवार, नरेश बलसाने, रमेश गरुड यांनी सापळा रचून पांढऱ्या कारमधील पाच जणांस ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली.
आरोपी रेमंड क्लिंच हा स्वराज्य मित्र मंडळाचा अध्यक्ष होता. त्या वेळी मंडळाच्या दहीहंडीच्या वर्गणीत गैरव्यवहार झाल्याने क्लिंच आणि बाळा जगताप (रा. आंग्रेवाडा) यांची भाडणे झाली होती. जगताप यांच्या गटातील व्यक्तींनी क्लिंच याच्या मोटारीची तोडफोड करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे क्लिंच याने चिडून जगताप यांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयाच्या कामासाठी पैशाची तजवीज म्हणून सराफाचे दुकान लुटण्याची योजना असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.