पुणे : लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे योगदान दर्शवणाऱ्या ‘धरोहर’ या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणासाठी ‘ब्रिगेडियर एस. डी. खन्ना कौशल्य प्रयोगशाळा’ स्थापन करण्यात आली आहे.
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागातर्फे २८ ते २९ जून या कालावधीत ‘सियोग २५’ परिषद झाली. या परिषदेमध्ये लष्करातील पहिल्या महिला तीन-स्टार अधिकारी सर्जन व्हाइस ॲडमिरल पुनीता अरोरा यांच्या हस्ते संग्रहालयाचे, तर सर्जन व्हाइस ॲडमिरल अनुपम कपूर यांच्या हस्ते कौशल्य प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेला लेफ्टनंट जनरल बी. के. गोयल, लेफ्टनंट जनरल पी. पी. राव, मेजर जनरल अश्विन गलगली, मेजर जनरल ए. के. श्रीवास्तव यांच्यासह डॉ. संजय गुप्ते, डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. अभिषेक मंगेशीकर, डॉ. मनीष माचवे, डॉ. पराग बिनीवाले यांनीही सहभाग घेतला.
परिषदेत प्रसूती आपत्कालीन सराव, सॉफ्ट एम्बाल्म्ड कॅडॅवरिक डिसेक्शन, हिस्टरोस्कोपी आणि लॅपरोस्कोपी सिम्युलेशन, प्रसूती सोनोग्राफी अशा विषयांवर प्रात्यक्षिकांची सत्रे झाली. तसेच कौशल्य-आधारित व्याख्याने, वैद्यकीय आणि शल्यचिकित्सा कौशल्ये या विषयांवरील सत्रे झाली.