महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिली होती. तसं न झाल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केलं होतं. त्यानुसार मनसे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अनेक काही ठिकाणी पोलिसानी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांचा वाद वाढतच जाताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील कसबा पेठ परिसरात पुण्येश्रवर मित्र मंडळाच्या हनुमान मंदिर आहे. त्याठिकाणी मनसेकडून ११ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. याच मंदिराच्या बाजूला हजरत खाजा शेख सलाहूदिन दर्गाह (मशीद) आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी महागाई, रोजगारावर बोलावं – अब्दुल सय्यद
यावेळी अब्दुल सय्यद यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजान सुरू राहणार आहे. आमच्यासोबत पोलिसांनी चर्चा केली आहे. तसेच आता निवडणुका जवळ आल्याने राज ठाकरे यांनी हा मुद्दा हाती घेतला आहे. या मुद्यावरून राजकारण केलं जात आहे. यामध्ये कोणत्याही समाजाने राज ठाकरे यांना पाठिंबा देऊ नये. अशा प्रकाराच्या कृत्यातून दोन समाजात तेढ निर्माण होतो. राजसाहेब ठाकरे यांनी महागाई, रोजगार, लोकांना सोयी-सुविधा कशा मिळतील आणि समाज कसा एकत्र राहील, यावर बोललं पाहिजे, अशी विनंती अब्दुल सय्यद यांनी केली आहे.

संबंधित परिसरात राहणारे मुस्लीम बांधव सईद यांच्यासोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, आज पहाटेची अजान झाली. यावेळी भोंगा वापरला नाही. पण आज एक वाजता होणार्‍या अजानावेळी निश्चित भोंग्याचा वापर होणार आहे. आम्ही सर्व नियम पाळून अजान करीत आहोत. आम्ही काही राज ठाकरे यांच्यामुळे आवाजच्या नियमाचे पालन केलेलं नाही. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करतोय. राज ठाकरेंचं नाव घेतलं की विषय वाढतो. पण एक सांगतो की,असे कितीही राज ठाकरे आले आणि गेले तरी अजान होताच राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim community in pune insist on giving azan on loud speaker raj thackeray should talk on inflation rmm
First published on: 04-05-2022 at 13:43 IST