नारायण राणे यांची काकडेंवर टीका
भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या गुंडांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. या प्रकाराचा हिशोब चुकविणार असल्याचे सांगत मतदानाच्या आदल्या दिवशी पुण्यात येऊन भाजपचे गुंड कसे त्रास देतात हे मी पहातो, असे सांगत राणे यांनी काकडे यांना लक्ष्य केले. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद करण्यात आले असतील तर कोणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला नारायण राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सुरुवात झाली. यानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत राणे यांनी काकडे यांच्यावर हल्ला चढवित हा आरोप केला. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार मोहन जोशी, गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, अॅड. अभय छाजेड यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
‘संजय काकडे यांच्या मार्फत तुम्ही भाजपमध्ये आलातर तर उमेदवारी मिळेल असे धोरण भाजपने ठरविले होते की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गुंडांना प्रवेश देतातच कसे?’ असे प्रश्न उपस्थित करून राणे म्हणाले की, काकडे आणि विचार या गोष्टींचा परस्पर कोणताही संबंध नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सरकारने काय काम केले यावर मते मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत नाही. मुख्यमंत्री पारदर्शकतेबाबत बोलतात, पण प्रत्यक्षात भाजपच्या या प्रकाराबाबत लोकांना विचारले तर उमेदवारी आणि पैसा मिळतो असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. पारदर्शकतेची भाषाण करणारे मुख्यमंत्री युती सरकारच्या कालावधीत मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळे ते काय आहेत ते मला आहे, असेही ते म्हणाले.
सेनेलाही चिमटा
शिवसेनेमध्ये दम असेल तर त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिपदे सोडावीत. राजीनामे देण्यासाठी असतात, खिशात ठेवण्यासाठी नाही, असा चिमटाही राणे यांनी शिवसेनेला काढला.