पुणे : नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या भागात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. आप्तकालीन उपाययोजनासंदर्भात विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी शनिवारी (१५ नोव्हेंबर) बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. नऱ्हे ते रावेत (सुतारवाडीमार्गे) दरम्यान उन्नत पुलाचा प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार आणि केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीर होरपळले. अपघाताच्या घटनेनंतर मुरलीधर माेहोळ यांनी शुक्रवारी सकाळी नवले पूल परिसरात भेट दिली. आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम या वेळी उपस्थित होते.

‘नवले पूल परिसराात यापूर्वी गंभीर अपघात घडले आहेत. त्यानंतर दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात होणारे गंभीर रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. भरधाव वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक पट्टीका बसविणे (रम्बलिंग स्ट्रीप), स्पीड गनची संख्या वाढविणे, बाह्यवळण मार्गावरील वळणे बंद करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर या भागातील अपघातांची संख्या कमी झाली. मात्र, गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या भागात दीर्घकालीन उपायोजना करणे गरजेचे आहे’, असे मोहोळ यांनी नमूद केले.

मोहोळ म्हणाले, ‘नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत यापूर्वी पुण्यात, तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. दरी पूल ते सुतारवाडी (पाषाण), सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्याचा आरखडा मंजूर झाला आहे. या कामाला गती देण्यासाठी गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे.‘

‘आप्तकालीन उपायोजनांतर्गत खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अवजड वाहनांच्या ब्रेकची तपासणी करण्यात येणार आहे. स्पीड गनची संख्या वाढवून भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. सेवा रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात येणार आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्यासाठी उपायोजना करता येईल. यादृष्टीने पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन शनिवारी केेले जाणार आहे. या यंत्रणांमध्ये सन्मवयांचा अभाव असणे गरजेचे आहे’, असे त्यांनी सांगितले.