पडद्यामागच्या कलाकारांसाठी आर्थिक निधी उभारण्याचा संकल्प अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेने केला आहे. ‘नाथ हा माझा’ या नाटकाच्या पाच प्रयोगांतून हा निधी उभारण्याचा मानस असून यामध्ये प्रसिद्ध अभिनेते व नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी ‘सुभानराव’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर येथे २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता ‘प्रबोधन माध्यम’ या संस्थेच्या सहकार्याने पहिला प्रयोग होणार आहे. यामध्ये दीपक रेगे ‘बारक्या’ ही व्यक्तिरेखा करणार असून जयंत बेंद्रे, उल्का चौधरी, माधुरी कान्हेरे, शेखर लोहकरे, वसंत भडके, सुधीर निरफराके, वृंदा बाळ आणि अरुण पटवर्धन हे कलाकार कोणतेही मानधन घेणार नाहीत, अशी माहिती नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रयोगांद्वारे जमा होणारा निधी रंगभूमी सेवक संघ संस्थेस देण्यात येणार आहे. याखेरीज नाटय़ परिषदेने राबविलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर पडद्यामागे काम करणाऱ्या पुण्यातील ८० कलाकारांसाठी स्टार मेडिकल इन्शुरन्सची योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येणार असून त्याचा खर्च नाटय़ परिषदेची पुणे शाखा करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.