पुणे : गेल्या वर्षी पुण्यातील गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन गणेश मंडळांकडून झाले होते. या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

गेल्या वर्षी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांना दिले होते. शहरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या होत्या. त्यात बहुतांश गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडून ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांची यादी गणेशोत्सवानंतर जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, अशी यादी जाहीर करण्यात आली नाही.

या प्रकरणी डॉ. कल्याणी मांडके यांनी न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायाधिकरणाने गेल्या वर्षी ३० ऑगस्टला गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायाधिकरणाने पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली. गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या ध्वनिप्रदूषण प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने पोलिसांसह प्रदूषण मंडळाला दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.

आवाजाची पातळी ७० ते ८५ डेसिबल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी गेल्या वर्षी ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. त्या शहरातील मध्यवर्ती भागातील मंडळांसह उपनगरांतील मंडळांचा समावेश होता. गणेशोत्सवात ७ ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही पातळी मोजली गेली. यात आवाजाची पातळी ७० ते ८५ डेसिबलपर्यंत नोंदविण्यात आली. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरभर ध्वनिप्रदूषण झाल्याची बाब निदर्शनास आली होती. यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवसाच्या ध्वनिप्रदूषणाची नोंद घेण्यात आली नव्हती.

पार्श्वभूमी काय?

गेल्या वर्षी प्रथमच गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी गणेश मंडळांच्या ठिकाणी तपासण्यात आली. सुमारे दोनशे मंडळांच्या ठिकाणी ही पातळी तपासण्यात आली. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळाची यादी जाहीर केली नाही. याचबरोबर या मंडळांवर केलेल्या कायदेशीर कारवाईचा कोणताही तपशील प्रदूषण मंडळ आणि पोलिसांनी जाहीर केलेला नाही.