scorecardresearch

राज्यातील ११ नवउद्यमींना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार

केंद्र सरकारतर्फे देण्यात आलेल्या राष्ट्रीय नवउद्यमी पुरस्कारात राज्याचा डंका वाजला आहे.

विविध विभागांमध्ये पुरस्कारांचे मानकरी

पुणे : केंद्र सरकारतर्फे देण्यात आलेल्या राष्ट्रीय नवउद्यमी पुरस्कारात राज्याचा डंका वाजला आहे. पुरस्कारातील विविध विभागांमध्ये मिळून राज्यातील एकूण ११ नवउद्यमींनी पुरस्कार पटकावला असून, त्यात मुंबईतील पाच, पुण्यातील चार, आणि वसई-विरार, नाशिक येथील प्रत्येकी एका नवउद्यमीचा समावेश आहे. देशातील युवा संशोधक आणि नवउद्यमींचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून राष्ट्रीय नवउद्यमी पुरस्कार दिले जातात. यंदा देशभरातून आलेल्या २ हजार १७७ अर्जामधून ४६ नवउद्यमींना पुरस्कार देण्यात आला. कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास, पर्यावरण, वित्त तंत्रज्ञान, आरोग्य निगा, ऊर्जा, वाहतूक आणि प्रवास अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या नवउद्यमींना गौरवण्यात आले.

पुरस्कारांमध्ये पुण्यातील चार नवउद्यमींपैकी डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या आत्रेय इनोव्हेशनने विकसित केलेले नाडी-तरंगिणी हे उपकरण इलेक्ट्रॉनिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहाय्याने नाडीपरीक्षा करून शरीरातील रोगाचे निदानासह नाडीपरीक्षेतील निरीक्षणांवर आधारित प्रकृती चांगली राखण्याबाबत सूचनाही करते. अपकव्‍‌र्ह बिझनेस सव्‍‌र्हिसेसच्या ‘उडचलो’ या अ‍ॅपद्वारे भारतीय सैन्यदल, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासासाठी तिकिटांची सुविधा मिळते. तर पायव्होटचेन सोल्युशन्स टेक्नॉलॉजीकडून रावेन या मंचाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ सव्‍‌र्हेलन्सची सुविधा पुरवली जाते. रिपोस एनर्जी घरपोच इंधन सेवा या क्षेत्रात कार्यरत आहे.

नाशिकमधील वेस्टाटॅगो इनोव्हेशन्स या नवउद्यमीने शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करण्यास, खर्च कमी करण्यास मदत करणारी प्रणाली निर्माण केली आहे. वसई विरारमधील बायोनिक होप या नवउद्यमीने स्पर्श जाणवू शकणाऱ्या ग्रिपी या रोबोटिक कृत्रिम हाताची निर्मिती केली आहे. मुंबईतील स्क्वेअर पांडा ही नवउद्यमी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंगणवाडी शिक्षिकांच्या प्रशिक्षणासाठी काम करत आहे. तर उन्नती एज्युकेअर सहा वर्षांवरील मुले संवादात्मक आणि कृती आधारित खेळांतून शिकण्यावर भर देण्यासाठी कार्यरत आहे. सागर डिफेन्स या नवउद्यमीने सागरी आणि हवाई वाहनांसाठीची मानवरहित मार्गदर्शक प्रणाली विकसित केली आहे. तर लामा लॉजिस्टिकने आयात निर्यात पद्धती सोपी करणारी प्रणाली, स्क्वेअरटेक आयटी सोल्युशन्सने सायबर सुरक्षेसाठीची अत्याधुनिक प्रणाली विकसित केली आहे. 

नवउद्यमी, युनिकॉर्न आणि मिळालेल्या पुरस्कारांतून महाराष्ट्राचा देशाच्या नवउद्यमी क्षेत्रातील वाटा मोठा आहे हे अधोरेखित होते. मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर भागांमध्ये नवउद्यमी कार्यरत आहेत. असे उदाहरण देशात अन्यत्र दिसत नाही. मात्र येत्या काळात राज्यातील नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद येथेही नवउद्यमींसाठी पूरक वातावरणनिर्मिती झाल्यास राज्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यावर पुण्यातील नवउद्यमी वातावरण बंगळुरू आणि दिल्लीच्याच तोडीचे होईल.

– प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (एमसीसीआयए)

रिपोस एनर्जी घरपोच इंधन सेवा या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या पेट्रोल, डिझेल आदी इंधन घरपोच दिले जाते. या पुढील काळात इथेनॉल, मिथेनॉल अशी इंधनेही दिली जातील. आयओटी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही काम करतो. गेली चार वर्षे सातत्याने काम केल्यावर रिपोस एनर्जीला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. या पुरस्कारांतून अन्य नवउद्यमींना नक्कीच प्रेरणा मिळेल.

– आदिती भोसले वाळुंज, चेतन वाळुंज, संस्थापक, रिपोस एनर्जी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National level awards entrepreneurs state ysh

ताज्या बातम्या