दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव, बेपर्वा नोकरशाही, देशांतर्गत नक्षलवादाचा वाढता प्रभाव, भ्रष्टाचार आदी गोष्टींमुळे देशाची बाह्य़ तसेच अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यासाठी कणखर नेतृत्व, युद्धसामग्रीचे सक्षमीकरणासह मतपेटीचे राजकारण न करता आवश्यक बाबींवर कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी चिंचवडला व्यक्त केले.
गांधी पेठ तालीम मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘भारतातील सुरक्षा व्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, मनोज देवळेकर, राजेंद्र घावटे, राजेश फलके, गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, भारताला भूतान वगळता खरा मित्र लाभलेला नाही, हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पाकिस्तानशी चार वेळा युद्ध जिंकूनही राजकीय मुत्सद्देगिरीच्या अभावामुळे तहात आपण हरलो. चीनकडून झालेल्या मानहानीकारक पराभवातून कोणताही धडा घेतला नाही. ज्या बांगला देशाला आपण स्वातंत्र्य केले, त्यांचीच घुसखोरी भारताची मोठी डोकेदुखी ठरली आहे. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकेकडून सातत्याने उपद्रव सुरू आहे. भारताचा हक्क असलेली सागरी सुरक्षा मोठा विनोद आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे व समान राष्ट्रीय कार्यक्रम राबवला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. सुहास पोफळे यांनी प्रास्तविक केले. ब. हि. चिंचवडे यांनी सूत्रसंचालन केले. राजू गोलांडे यांनी आभार मानले.