राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दररोज सकाळी एकत्र येतात. अगदी पाच-दहा स्वयंसेवक असले, तरी एकत्र येतात. कवायत करतात, चर्चा करतात. आपल्या कार्यकर्त्यांनी रोज नाही, पण किमान आठवड्यातून एकदा एकत्र यावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला.

हेही वाचा >>> ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी पक्षांतर्गत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दररोज सकाळी एकत्र येतात, कवायत करतात आणि चर्चा करतात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दररोज नाही, किमान आठवड्यातून एकदा एकत्र येण्यास हरकत नाही. त्यामुळे पक्षाची प्रकृती चांगली होईल. पक्ष मजबूत होण्यास मदत होईल. त्यासाठी पक्षात चर्चा झाली पाहिजे. आपला पक्ष हुकूमशाहीचा नाही, तर लोकशाहीचा आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीला कायम प्राधान्य दिले आहे. संघामध्ये लोक गोळा होतात आणि चर्चा करतात. त्याप्रमाणे शनिवारी आपल्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करायला हवी. शनिवार हा बजरंग बलीचा वार आहे. त्यामुळे या दिवशी चर्चा करा, असेही पाटील यांनी कार्यकर्त्यांना या वेळी सांगितले.