तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान डोक्याला बंदुकीची गोळी लागलेल्या पराग इंगळे या विद्यार्थ्यांचा गुरूवारी दुपारी मृत्यू झाला. या अपघातानंतर तीन वर्षे पराग कोमात होता.
पराग हा पाषाण येथील लॉयला शाळेचा विद्यार्थी होता. १ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रीय छात्र सेनेच्या सरावादरम्यान त्याच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागली होती. जमिनीवर झोपून गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देत असताना पराग अचानक उठून उभा राहिला आणि त्या वेळी त्याचे प्रशिक्षक आमोद घाणेकर यांच्या बंदुकीतील गोळी परागच्या डोक्याला लागली होती. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, मात्र त्यानंतर गेली तीन वर्षे पराग कोमात होता. या अपघातावेळी परागचे वय १४ वर्षे होते. गेल्या दोन दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. अखेर गुरूवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
या प्रकरणी घाणेकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी परागचे वडील देवेंद्र इंगळे यांनी केली होती. याबाबत ते म्हणाले, ‘न्यायासाठी माझा लढा कायम राहील. घाणेकर यांच्यावरील आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत. या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी.’