पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २०१७ मधील प्रभाग रचना ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याने भाजपमध्ये उत्साहाचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) निरुउत्साहाचे वातावरण आहे. चारसदस्यीय पद्धतीने झालेल्या प्रभाग रचनेचा फायदा होऊन भाजपची एकहाती सत्ता आली होती. ही प्रभाग पद्धत भाजपसाठी सोईची मानली जात असून महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षांची अडचण झाली असल्याने महायुतीमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभाग तयार करण्यात आले होते. या प्रभाग रचनेचा भाजपला फायदा झाला. ७७ नगरसेवकांसह महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता उलथवून टाकली. प्रभाग रचना तयार करताना भाैगोलिक सलगता, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, रस्त्यांच्या नैसर्गिक मर्यादा विचारात घेतल्या नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. आता आगामी निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना झाल्याने भाजपने शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व १२८ जागांवर ताकदीचे उमेदवार असून स्वबळावर लढण्याचा शहर भाजपचा आग्रह आहे. तर, प्रतिकूल प्रभाग रचना असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामधील इच्छुकांमध्ये अस्वस्थतता दिसून येत आहे. मागीलवेळी नैसर्गिक सीमांचे उल्लंघन केले होते. तीच प्रभाग रचना कायम ठेवल्याने या रचनेवर हरकती घेणार असल्याचे ‘राष्ट्रवादी’कडून सांगण्यात आले. प्रभाग रचनेबाबत विरोधाभास असेल तर हरकत घेता येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले आहे.

गेल्या निवडणुकीत १४३० हरकती

२०१७ मध्ये प्रारूप प्रभाग रचनेवर एक हजार ४३० हरकती आल्या हाेत्या. त्यामध्ये तळवडे, चिखली गावठाण, साेनवणे वस्ती, माेरेवस्ती या प्रभाग क्रमांक एकबाबत सर्वाधिक एक हजार २९९ हरकती आल्या हाेत्या. आता २०१७ चीच प्रभाग रचना कायम असल्यामुळे किती हरकती, सूचना येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपचा स्वबळाचा नारा

प्रभाग रचना ‘जैसे थे राहिल्याने मागीलवेळी ७७ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा भाजपने दिला असून ३२ प्रभागात ताकदीचे उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह शहर भाजपने धरला आहे.

२०१७ प्रमाणेच प्रभाग रचना झाली. मागीलवेळी भाजपचे ७७ नगरसेवक होते. नगरसेवकांनी काम केल्याने प्रभाग रचना अनुकूल आहे. शंभर नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. ३२ प्रभागांचा दौरा सुरु असून सर्वेक्षणानुसार उमेदवारी दिली जाईल. स्वबळावर लढण्याची मागणी कायम असून अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील. – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप

मागीलवेळी नैसर्गिक सीमा न पाळता केलेली प्रभाग रचना आताही कायम ठेवली आहे. त्यामुळे हरकती घेतल्या जाणार आहेत. हरकती कितपत ऐकल्या जातील याबाबत शंका आहे. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार तयारी सुरू आहे. स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे. युतीबाबतचा अंतिम निर्णय अजित पवार घेतील. – योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)