पुण्याच्या क्रिकेटपटूंनी देशाचे नेतृत्त्व केले असते. मात्र त्यांना काही कारणास्तव क्रिकेट मध्येच थांबवावे लागले. याबद्दल पुणेकरांच्या मनात असणारी खंत माझ्याकडे आयसीसीचे नेतृत्त्व आल्यानंतर दूर झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. म्हाळुंगे-बालेवाडीमधील श्री छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या वेटलिफ्टिंग सभागृहात माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

‘पुण्याचे सदानंद आणि अशोक मोहोळ हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत होते. त्यांच्यामध्ये देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता होती. मात्र काही कारणास्तव त्यांना क्रिकेट मध्येच थांबवावे लागले. आपले क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले नाहीत, ही खंत पुणेकरांच्या मनात होती. मात्र मी आयसीसीचा अध्यक्ष झाल्याने जगभरातील क्रिकेटचे नेतृत्त्व माझ्याकडे आले आणि पुणेकरांच्या मनातील खंत दूर झाली,’ असे पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते अशोक मोहोळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्याचे नेतृत्त्व करणाऱ्यांमध्ये ज्या मंडळींची नावे घेतली जातात, त्यामध्ये मामासाहेब मोहोळचे नाव आवर्जून घ्यावे लागले. गिरणी कामगार, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. मावळमधील कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. शिक्षण क्षेत्रात अनेक कामे होत असतात. परंतु ती दिसत नाही. मामासाहेबांच्या समाजकार्याचा हा वारसा पुढे चालवण्याचे काम मोहोळ कुटुंबीय करत आहे. आता नव्या पिढीने हे सर्व चांगले गुण घेतले आहेत. सत्तेच्या जवळ जाऊन ही चांगली परंपरा जतन केली आहे’, असेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना अशोक मोहोळ म्हणाले की, ‘मी जे काही काम हाती घेतले. ते उत्तम प्रकारे पाडल्याचे समाधान मिळते. आई वडिलांचे संस्कार, पत्नीची साथ आणि कार्यकर्त्यांच्या मदतीचा माझ्या या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजचा हा सत्कार तुम्हा सर्वांचा असल्याचे मी मानतो. माझ्या राजकीय जीवनामध्ये शरद पवार, विदुरा नवले, अनंतराव थोपटे या नेत्यांची मोलाची साथ लाभली.’

यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, ‘शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून सध्या निष्ठावान कोणाला म्हणावे हे कळण्यास मार्ग राहिला नाही. आमचे कुठेही सरकार नाही. मात्र आम्ही सध्या फेरीवाल्यांसंदर्भात काम करत आहोत.’ हे काम भारी झाल्याचे नांदगावकर यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. यापुढे बोलताना, ‘शरदरावांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोक पण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. पवारसाहेब, तुम्हाला एक पी (पद्मविभूषण) मिळाला. दुसरा पी (पंतप्रधानपद) कधी मिळणार?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.