शहराचा कायापालट केल्याचे राष्ट्रवादीचे ढोल

गेल्या दहा वर्षांत सत्तेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडचा कायापालट केल्याचे ढोल बडवत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी उद्योगनगरीला ‘विकासनगरी’ बनवल्याचा मुद्दा अग्रभागी ठेवला आहे. प्रत्यक्षात, विकासाच्या नावाखाली भ्रष्ट कारभार झाल्याने विकासकामांचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. प्रकल्पांची घोषणा करायची, मात्र, ती पूर्णत्वाला न्यायची नाही, अशी कार्यपद्धती राहिल्याने ‘पुढच पाठ आणि मागचं सपाट’ असेच चित्र दिसून येत आहे.

‘लक्ष्य २०१७’ ला सामोरे जाताना  पिंपरी पालिकेत १० वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या राष्ट्रवादीने शहरविकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे. शहरातील रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, विविध प्रकल्प, उद्याने आदी कामांसाठी कोटय़वधी रुपये खर्ची घालून शहर चकचकीत केल्याचा युक्तिवाद सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असून त्याचे जोरदार मार्केटिंग शहरभरात सुरू आहे. दुसरीकडे, विकासाच्या नावाखाली करदात्या नागरिकांच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी संगनमताने दरोडे टाकल्याचा हल्लाबोल विरोधकांकडून सातत्याने होत आहे. ‘विकास विरुद्ध भ्रष्टाचार’ या मुद्दय़ावर राजकीय लढाई सुरू झाली असताना पिंपरी-चिंचवडची ‘विकासनगरी’ बनवल्याचा डंका राष्ट्रवादीकडून वाजवण्यात येऊ लागला आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का, याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येते.

देशातील विकसित शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. नागरिकांनी पूर्ण बहुमत दिल्याने पाच वर्षांत शहराचा सर्वागीण विकास झाला आहे. शहरभरात विकासाची भरीव कामे झाली आहेत. नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेता आले. यापुढेही आणखी विकास करणार असून हिरवेगार व सुंदर शहर करण्याची संकल्पना आहे. त्यासाठी उद्याच्या काळातही नागरिकांनी असाच आशीर्वाद द्यावा, अशी अपेक्षा आहे.

अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री