पीएमपी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय मंगळवारी (२९ ऑक्टोबर) स्थायी समितीमध्ये होणार असताना या विषयाचेही राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारीच बोनसची घोषणा करून श्रेय मिळवण्याचा प्रयत्न केला.
पीएमपी कामगारांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्याबाबत गेल्या आठवडय़ात मुख्य सभेत निर्णय होऊ न शकल्यामुळे त्यासंबंधीचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी होणार आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांना पुणे महापालिकेने ८.३३ टक्के बोनस आणि सात हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, असा ठराव स्थायी समितीमध्ये दाखल करण्यात आला असून हा ठराव मंगळवारी स्थायी समितीमध्ये मंजूर केला जाणार आहे. काँग्रेससह शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा या ठरावाला पाठिंबा आहे. हा ठराव मंजूर होण्याआधीच कामगारांना ८.३३ टक्के बोनस आणि सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान, अशी घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. राष्ट्रवादी कामगार संघटनेने केलेल्या रास्ता रोकोनंतर ही घोषणा करण्यात आली.
गेल्यावर्षी कामगारांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे यंदा सात हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी कामगारांची मागणी आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून सोमवारी सहा हजारांचीच घोषणा करण्यात आली आहे.
कुठे राजकारण करायचे तेही
राष्ट्रवादीला कळत नाही – शिंदे
पीएमपी कामगारांच्या बोनसबाबत मंगळवारी निर्णय होणार हे माहिती असतानाही त्या विषयाचे राजकारण राष्ट्रवादीने केले. मुळात, आम्ही तसा ठराव दिल्यानंतर राष्ट्रवादीला जाग आली. वरातीमागून घोडं असाच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. कामगारांना अशाप्रकारे दिवाळी बोनस मागायची वेळ का येते, त्या पक्षाच्या नेत्यांकडे कॅलेंडर नाही का, दिवाळीपूर्वीच हा निर्णय का होत नाही, अशी विचारणा करून शिंदे म्हणाले की, वास्तविक, सन्मानाने बोनस देण्याची आवश्यकता होती; पण राष्ट्रवादीला कुठे राजकारण करायचे तेही कळत नाही.