राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर कुरघोड्यांचं राजकारण सुरु – आढळराव पाटील

पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मरगळ आल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

शिवाजीराव अढळराव पाटील

राज्यात आम्ही सत्तेत आहोत मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर कुरघोड्या सुरु असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मरगळ आल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेकडून नुकतीच राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांची उमदेवारी जाहीर झाली. यासाठी आढळराव पाटील यांची वर्णी लागेल असं बोललं जात होतं. मात्र, शिवसेनेने त्यांना डावललं. यावर पक्षप्रमुखांचा निर्णय योग्य असल्याचे आढळराव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला.

पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मरगळ आली असल्याचे सांगताना इथं राष्ट्रवादीकडून पक्षावर कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवसेनेनं भूमिपुजन केलेल्या राजगुरुनगर खेड पंचायत समितीच्या इमारतीचं काम पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि दिलीप मोहिते-पाटील यांनी थांबवल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कामांमध्ये आडकाठी आणण्याचं काम सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात आली असून पक्षप्रमुख पुणे जिल्ह्यात शिवसेनेला चांगलं बळं देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळेला शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, यंद्याच्या (२०१९) लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव यांचा पराभव करीत या जागेवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. दरम्यान, लोकसभेच्या प्रचारादरम्यान आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर टीका करताना त्यांच्या जातीचा उल्लेख केल्याने मोठी चर्चा झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp has started a politics of mischief on shiv sena says shivajirao adhalrao patil aau