पर्वती विधानसभा मतदारसंघातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपोषण करण्यात आले. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारीसंदर्भात येत्या शनिवारपर्यंत ठोस उपाययोजना केल्या जातील, असे पत्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आळंदी आमचे श्रद्धास्थान; आळंदीत चर्च उभा राहणार नाही याची काळजी घेऊ- हिंदू महासंघ

राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली योगेश पवार, सुशांत ढमढेरे, गणेश दामोदरे, गौरव घुले यांनी उपोषण केले. पर्वती जलकेंद्रातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची उंची कमी असल्यामुळे, वीज पुरवठा खंडित होत असल्याने तसेच मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याची कारणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिली जात आहेत. पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, संपूर्ण सहकारनगर, अरणेश्वर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी परिसर, मार्केटयार्ड परिसराला विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनीही काही दिवसांपूर्वी या भागाला विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याची कबुली दिली होती. अपुरा आणि काही मिनिटेच पाणीपुरवठा होत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपोषण सुरू करण्यात आल्यानंतर मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी त्यांच्याकडे केल्या.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड रस्त्यावर उतरले यमराज; नियम पाळा अन्यथा माझ्या सोबत चला!

पाणीपुरवठ्यातील अडचणी, समस्या आणि त्रुटी येत्या शनिवार पर्यंत सोडविण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच पत्रही पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले. शनिवारपर्यंत पाणीपुरवठ्याची समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतोष नांगरे यांनी दिला.  शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, महेश शिंदे, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, विपुल म्हैसूरकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp hunger strike against erratic water supply pune print news apk 13 zws
First published on: 17-01-2023 at 18:01 IST