शिवसेना पक्षाला ५० वर्षे झाली असून २५ वर्षे युतीत सडल्याची बाब उशीरा का होईना, त्यांच्या लक्षात आली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. ‘शिवसेना ज्या पक्षासोबत राज्याच्या सत्तेत भागीदार आहे, त्याच पक्षाच्या कारभारावरून ही युती तुटली आहे. यातून राज्याच्या जनतेने काय तो बोध घ्यायचा तो घ्यावा. पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार यावरुन युती तुटली नसून जागावाटपावरून युती तुटली आहे. मुंबईत सत्ता कोणाची यावरून मतभेद झाल्याने असे घडले आहे,’ अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.
‘राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकास आराखड्यामध्ये पुणेकरांची फसवणूक करण्यात आली आहे. अनेक आरक्षणे बदलण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडून लवकरच राज्य सरकारच्या विकास आराखड्याचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या विकास आराखड्यामुळे पुणेकरांचे नुकसान होऊ देणार नाही,’ असे म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
जंगली महाराज रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुनील टिंगरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. यावेळी शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके उपस्थित होते.
जागावाटपाबाबत ८० टक्के काम पूर्ण- अजित पवार
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली असून आम्ही करण्यासाठी आग्रही आहोत. जागावाटपासंदर्भात ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के जागांवर सन्मानपूर्वक वाटाघाटी करण्यासाठी शनिवारी आज अंतिम बैठक होणार आहे. या विधानावरुन अजित पवार यांनी आघाडी करण्याचे संकेत दिले.
‘आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहे. सन्मानपूर्वक जागावाटप व्हावे, अशी आमची भूमिका आहे’, असे अजित पवार यांनी म्हटले. ‘दोन्ही पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार आणि सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्या. मात्र, आघाडीची चर्चा करण्यासाठी आता वेळ राहिला नसून लवकरच अंतिम निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.