पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) शुक्रवारी बैठक घेऊन निवडणूक तयारीला प्रारंभ केला आहे. निवडणुकीत आघाडीबाबत सद्य:स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच, प्रभाग रचनेसंदर्भात तक्रारी नोंदविण्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. त्या संदर्भात येत्या चार महिन्यांत निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी झाली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेत्या माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार बापू पठारे, माजी आमदार कमल ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, विशाल तांबे, अश्विनी कदम, श्रीकांत पाटील, सचिन दोडके, भगवानराव साळुंखे, डॉ. सुनील जगताप, पंडित कांबळे, प्रकाश म्हस्के यावेळी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीसंदर्भात प्रामुख्याने मित्रपक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात शहरातील परिस्थितीचा आढावा आणि अंदाज घेण्यात आला. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रभाग रचनेसंदर्भात निर्माण होणाऱ्या संभाव्य तक्रारींबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे जबाबदारी देण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. महापालिकेत यापूर्वी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने नियोजनबद्ध विकास न करता शहरात केलेल्या चुकीच्या कामामुळे शहराची झालेली वाताहत, मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी, पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये साचणारे पाणी, त्यामुळे होणारे नुकसान, पर्यावरणासंदर्भात हाती घेण्यात आलेले चुकीचे प्रकल्प या सर्व कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. त्यादृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करून सर्व आघाड्यांना तयार राहण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.